(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime news : एकावर एक फ्री थाळी पडली दोन लाखांना; पुण्यात सायबर भामट्यानं महिलेला घातला गंडा
पुण्यातील एका महिलेला जेवणावरची ऑफर चांगलीच महागात पडली आहे. फेसबुकवर एका थाळीवर एक थाळी फ्री ऑफर असल्याचे भासवून सायबर चोरट्याने महिलेला तब्बल दोन लाख रुपयांना गंडा (Cheating Case) घातला आहे.
Pune Crime news : पुण्यातील एका महिलेला जेवणावरची ऑफर चांगलीच महागात पडली आहे. फेसबुकवर एका थाळीवर एक थाळी फ्री ऑफर असल्याचे भासवून सायबर चोरट्याने महिलेला तब्बल दोन लाख रुपयांना गंडा (Cheating Case) घातला आहे. विशेष म्हणजे हे सायबर चोरटे केरळचे असून त्यांनी पुण्यातील सुकांता येथील थाळी फ्री ऑफर दिली होती.
याबाबत शुक्रवार पेठेतील एका 38 वर्षाच्या महिलेने खडक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रकाश कुमार (रा. गार्डन बाजार, मुन्नर, केरळ) आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 22 जुलै 2022 रोजी घडला होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आईचे फेसबुकवर सुकांता थाळीची एका थाळीवर एक थाळी फ्री, अशी ऑफर असल्याचे जाहिरात आली होती.
फिर्यादी यांच्या वडिलांनी त्यावरील मोबाईल नंबरवर फोन केला असताना त्यांनी बँक खात्याची माहिती घेऊन त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवरुन 1 लाख 99 हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव तपास करीत आहेत.
यापूर्वीही घटला होता असा प्रकार...
यापूर्वी सुकांता थाळी फ्रि देण्याचा ऑफर देत सायबर भामट्यानी दोघांना लाखोंचा गंडा घातला होता. 'एकावर एक थाळी फ्री' देतो सांगत लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे दोन धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आले होते. पुण्यातील एका खवय्याला प्रसिद्ध असलेली 400 रुपयांची सुकांता हॉटेलची थाळी 1 लाख 52 हजार रुपयांना तर दुसऱ्याला 3 लाख 34 हजार रुपयांना पडली आहे. 'एकावर एक थाळी फ्री देतो' असं आमिष दाखवत खवय्येगिरीचा फायदा उठवत सायबर चोरांंकडून गंडा घातला गेला होते. पुण्यातील कोरेगाव परिसरात राहणाऱ्या 39 वर्षीय सुशील कुमार खंडेलवाल यांना 1 लाख 52 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. त्यासंदर्भात त्यांनी लगेच कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
सुशील कुमार खंडेलवाल इंजिनिअर होते. पुण्यातील कंपनीत ते कार्यरत होते. त्यांच्या पत्नीने ऑनलाईन सुकांता हॉटेलची जाहिरात पाहिली. एका थाळीवर एक थाळी फ्री देणार अशी ती जाहिरात होती. त्या जाहिरातीवर फोन नंबर देखील देण्यात आला होता. त्या नंबरवर त्यांच्या पत्नीने फोन केला. त्यानंतर त्यांना झेडओएचओ नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितलं. त्यानुसार त्यांनी ते अॅप डाऊनलोड केलं आणि लाखो रुपयाचं नुकसान झालं होतं.