Pune Crime: पुण्यात पुन्हा ड्रग्ज सापडलं, कुरिअरच्या माध्यमातून 'माल' पोहोचवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Pune News: पुण्यातील गुन्हेगारी हा कायम चर्चेचा विषय असतो. अशातच आता पुण्यात मोठ्याप्रमाणावर ड्रग्ज विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. विश्रांतवाडी परिसरात 1 कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त
पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारी आणि ड्रग्जची समस्या चिंतेचा विषय बनली आहे. पोलिसांकडून ड्रग्जची विक्री करणाऱ्यांवर आणि रेव्ह पार्टी करणाऱ्यांवर कारवाई केली जात असली तरी आता ड्रग्जच्या विक्रीसाठी (Drugs) नवनवे मार्ग वापरले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) ड्रग्ज प्रकरणात एका व्यक्तीला अटक केली आहे. हा व्यक्ती कुरिअरच्या माध्यमातून ड्रग्ज पुरवठा करण्याचे काम करत होती.
गेल्या अनेक दिवसांपासून हा व्यक्ती कुरिअरच्या पार्सल्सचा वापर करुन ग्राहकांना ड्रग्ज पुरवत होता. पुणे शहर आणि शहराबाहेर हा व्यक्ती कुरिअरच्या माध्यमातून ड्रग्ज पाठवायचा, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे. विश्वनाथ कोनापूरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात तब्बल 1 कोटी रुपयांचा ड्रग्जचा साठा जप्त केला होता. याप्रकरणी ड्रग्स विकत असताना एकूण तीन आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली होती.
अटकेत असलेल्या आरोपींकडे चौकशी सुरू असताना एक आरोपी अनेक ठिकाणी कुरिअरने ड्रग्स पाठवत असल्याची माहिती समोर आली. त्याआधारे पोलिसांनी कारवाई करत विश्वनाथ कोनापूरे याला ताब्यात घेतले होते. त्याने आता नेमक्या कोणाला ड्रग्ज विकले होते, याची माहिती आता चौकशीतून समोर येईल. त्यामुळे पोलीस आता याप्रकरणात आणखी कोणाला ताब्यात घेणार, हे पाहावे लागेल.
कात्रजमध्ये सापडलं 21 लाखांचं मेफेड्रोन
गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात सातत्याने ड्रग्ज सापडत आहेत. अलीकडेच कात्रज परिसरात 106 ग्रॅम मेफड्रोन सापडले होते. या मेफेड्रॉनची किंमत 21 लाख रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जाते. कात्रज परिसरात मेफेड्रोन (एमडी) विक्री करण्यासाठी दोन तरुण आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, सापळा रचून ड्रग्जची विक्री करणाऱ्या राजस्थानमधील दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली होती.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील ड्रग्जची समस्या ऐरणीवर आली होती तेव्हा काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात जात धारेवर धरले होते. ड्रग्ज व्यावसायिकांकडून पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना हप्ते दिले जातात, असा आरोप दोन्ही नेत्यांनी केला होता. यामध्ये पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची चांगलीच नाचक्की झाली होती. यानंतर पुणे पोलिसांनी ड्रग्जविरोधी मोहीम सुरु केली होती.
आणखी वाचा