Pune News : पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई! खेड शिवापूर टोल नाक्यावरुन जप्त केले 5 कोटी रुपयांचे मेथॅम्फेटामाइन ड्रग्ज
शिक्षणाचं माहेर घर असलेलं पुणे आता ड्र्ग्जच्या विळख्यात असल्याचं मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या घटनांमधून समोर आलं आहे. पुणे पोलिसांनी 5 कोटी रुपयांचे एक किलो मेथॅम्फेटामाइन ड्रग्ज जप्त केले आहे.
Pune News : शिक्षणाचं माहेर घर असलेलं पुणे आता ड्रग्जच्या (pune crime news) विळख्यात असल्याचं मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या घटनांमधून समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी 1 कोटी 14 लाखांचं LSD स्ट्रिप्स जप्त केल्यानंतर आता पुणे पोलिसांनी 5 कोटी रुपयांचे एक किलो मेथॅम्फेटामाइन ड्रग्ज जप्त केले आहे. पुणे पोलिसांनी मागील काही दिवसांपासून ड्रग्ज रॅकेटवर करडी नजर ठेवली आहे. त्यामुळे सध्या पुण्यातील ड्रग्ज रॅकेटवर धडक कारवाई करण्यात येत आहे.
मेथॅम्फेटामाइन हे अंमली पदार्थ जलद आणि दीर्घकाळ टिकणारे प्रभाव असलेले कृत्रिम औषध, उत्तेजक म्हणून बेकायदेशीरपणे वापरले जाते. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक आणि कस्टम विभागाची संयुक्त कारवाई केली आहे. या सर्व प्रकरणी चार जणांना अटक केली आहे. 29 मे रोजी एका वाहनामधून पुण्याजवळील खेड शिवापूर टोल नाक्यावर 850 ग्रॅम ड्रग जप्त करण्यात आले. याप्रकरणी सखोल तपास करताना पुणे पोलिसांनी लोणावळ्याजवळ आणखी 200 ग्रॅम मेथॅम्फेटामाइन जप्त केले.नेमके हे अंमली पदार्थ हे कोणाला विकणार होते आणि कुठून आणले होते याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. मात्र 5 कोटीचं ड्रग्ज सापडल्याने पुण्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
पुणे शहर ड्रग्जच्या विळख्यात?
मागील काही दिवसांपासून पुणे पोलिसांनी आणि अंमली पदार्थ पथकांनी ड्रग्ज विरोधात धडक कारवाईला सुरुवात केली आहे. रोज रात्री पेट्रोलिंग करुन आणि मिळालेल्या टिपवरुन पोलीस सापळा रचून या कारवाया करत आहे. दर दोन दिवसांनी पुण्यात ड्रग्जवर कारवाई झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे पुणे शहरात सध्या ड्रग्ज रॅकेट सक्रिय असल्याचं समोर येत आहे. तीन दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी दोन दिवस सतत कारवाई करत 1 कोटी 14 लाखांचे LSD स्ट्रिप्स जप्त केल्या होत्या. फुड डिलिव्हरी अॅपचा वापर करत या LSD स्ट्रिप्सची विक्री होत असल्याचं तपासात समोर आलं होतं. त्यानंतर एकाला ताब्यात घेऊन रॅकेटचा शोध घेतला असता त्याच्यासोबतच चार तरुण अशाच प्रकारे LSD स्ट्रिप्सची विक्री करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. या पाचही जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन कारवायांमध्ये तब्बल 1 कोटी 14 लाखांचे LSD स्ट्रिप्स जप्त केल्या होत्या. या स्ट्रिप्सची विक्री करणारे सगळे तरुण उच्चशिक्षित असून पार्ट्या आणि बाकी खर्च भागवण्यासाठी विक्री करत असल्याचं तपासात पुढे आलं होतं.