Pune Crime News : तुझं पॉलिटिकल करिअर बरबाद करू; काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना व्हॉट्सअॅप मॅसेजद्वारे जीवे मारण्याची धमकी
Pune Crime: भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्यापाठोपाठ भाजप नेते गणेश बीडकर आणि आता काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्याकडे तीस लाख रुपये खंडणी मागणीसाठी फोन आला आहे.
Pune Crime News : पुण्यातील (Pune News) नेत्यांना फोनवरुन धमकावण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. भाजप नेते मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यानंतर भाजप नेते गणेश बीडकर आणि आता काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्याकडे तीस लाख रुपये खंडणी मागणीसाठी फोन आला आहे. एका अज्ञात इसमानं व्हॉट्स अॅपद्वारे खंडणी मागून तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा केला मेसेज आणि फोन केला आहे. अविनाश बागवे हे माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांचे सुपुत्र आहेत. या घटनेमुळे पुण्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी स्वतः अविनाश बागवे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. अज्ञात व्यक्ती विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार काल (मंगळवारी) म्हणजेच, 4 मार्च रोजी दुपारी पावणे चारच्या सुमारास घडला. अविनाश बागवे यांना काल एका अज्ञात इसमाने व्हॉट्सअॅपवर मेसेज करून तीस लाख रुपये दे नाहीतर तुझं पॉलिटिकल करिअर बरबाद करू अशी धमकी आली. तसेच पुढे या व्यक्तीने, "तुला माहिती नाही आम्ही सात आठ जण आहोत. पोलिसांनी आमच्यामधील दोघांना जरी आत टाकलं तरी आम्ही तुझ्या ऑफिसच्या आणि घराबाहेर असतो" असा आणखी एक मेसेज आला. या सगळ्या प्रकरणानंतर अविनाश बागवे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पुण्यात राजकीय नेत्यांना धमकावण्याचे प्रकार सातत्याने सुरुच आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या दोन नेत्यांंनाही असे फोन करुन धमकावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि भाजप नेते गणेश बीडकर यांना धमकवलं होतं. माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावे फोन करुन धमकावून पैसे मागण्यात आले होते. त्यानंतर गणेश बीडकर यांना फोन करुन 'तेरा पॉलिटीकल करियर बरबाद करूंगा' अशी धमकी देत त्यांच्याकडे 25 लाखांची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर दोघांनीही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस तपास करत आहे.
बीडकर यांना तर श्रीराम नवमीच्या मिरवणुकीमध्ये असताना त्यांना एका नंबरवरून व्हॉट्सअॅप कॉल आला होता. त्याने हिंदी-मराठी भाषेतून बीडकर यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तुला राजकीय मस्ती आली आहे, तेरे पास बहोत पैसे हो गया है, अब थोडा खर्चा भी कर, नाही तर तुझी बदनामी करून तेरा पॉलिटीकल करिअर बरबाद करूंगा, तू चुपचाप 25 लाख रूपये दे, अशा शब्दांत त्यांना धमकावण्यात आलं होतं.