Pune crime Ganesh Bidkar : 'तेरा पॉलिटीकल करियर बरबाद करूंगा', धमकी देत भाजप नेते गणेश बिडकरांकडे 25 लाखांच्या खंडणीची मागणी
माजी नगरसेवक आणि पदाधिकारी गणेश बिडकर (Ganesh Bidkar ) यांना व्हॉट्यअॅप कॉल करून तब्बल 25 लाख रूपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी पुण्याच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune crime Ganesh Bidkar : माजी नगरसेवक आणि पदाधिकारी गणेश बिडकर (Ganesh Bidkar) यांना व्हॉट्यअॅप कॉल करून तब्बल 25 लाख रूपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी पुण्याच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिडकर यांच्याकडे 25 लाखाच्या खंडणीची मागणी झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकऱणी बिडकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
नेमकं काय घडलं?
30 मार्च 2023 रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गणेश बिडकर हे श्रीराम नवमीच्या मिरवणुकीमध्ये असताना त्यांना एका नंबरवरून व्हॉट्सअॅप कॉल आला. त्याने हिंदी-मराठी भाषेतून बिडकर यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तुला राजकीय मस्ती आली आहे, तेरे पास बहोत पैसे हो गया है, अब थोडा खर्चा भी कर, नाही तर तुझी बदनामी करून तेरा पॉलिटीकल करिअर बरबाद करूंगा, तु चुपचाप 25 लाख रूपये दे, अशा शब्दांत त्यांना धमकावण्यात आलं. तुने अगर पैसे नही दिये तो तु देख कैसे खेल शुरू होनेवाला है, असं म्हणत त्यांना शिवीगाळ केली आहे.
यासंदर्भात बिडकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी व्हॉट्सअॅप नंबर धारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या सगळ्या प्रकरणाता सखोल तपास पुणे सायबर पोलीस करत आहेत. सध्या असे खंडणी मागण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहे. त्यामुळे कोणत्याही धमकीला किंवा खंडणी मागितल्यास घाबरु नका, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
मोहोळांच्या नावाने मागितली खंडणी...
मागील आठवड्यात पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने एका व्यावसायिकाकडे (Builder) तब्बल तीन कोटी रुपयांची खंडणी (Extortion) मागितल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली होती. संदीप पाटील आणि शेखर ताकवणे अशी अटक केलेल्या दोघांची नावं होती. भारतीय युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी तीन कोटी रुपये द्या असं म्हणत या दोघांनी एका बिल्डरकडे खंडणी मागितली होती. पुण्यातील (Pune) नामांकित व्यावसायिकाने या संदर्भात पोलिसात तक्रार दिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला होता. संदीप पाटील आणि शेखर ताकवणे यांची ओळख एका मंदिरात झाली होती. संदीपने शेखरला पैसे कमावण्यासाठी अमिष दाखवलं आणि त्या दोघांनी हा प्लॅन आखला. संदीप पाटीलने त्याच्या मोबाईलवर "कॉल मी" नावाचे एक ॲप डाऊनलोड करुन त्यात भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांचा मोबाईल क्रमांक सेव्ह केला. या ॲपद्वारे त्यांनी व्यावसायिकाला मोहोळ बोलतोय असे भासवले आणि त्यांना भाजप युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी हे पैसे लागणार आहेत असं सांगितलं होतं.