Pune Koyta Gang: पुण्यात कोयता गँगची दहशत, 17 वर्षीय मुलावर जीवघेणा हल्ला
Pune Crime News: पुण्यातील कोयता गँगची दहशत आता शाळांपर्यंत पोहोचली आहे. पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात शिकणाऱ्या 17 वर्षांच्या एका विद्यार्थ्यावर दोन तरुणांनी शाळेच्या बाहेर कोयत्याने हल्ला चढवला.
Pune Crime News: पुण्यातील कोयता गँगची दहशत (Pune Koyta Gang) आता शाळांपर्यंत पोहोचली आहे. पुण्यातील (Pune) नूतन मराठी विद्यालयात शिकणाऱ्या 17 वर्षांच्या एका विद्यार्थ्यावर दोन तरुणांनी शाळेच्या (Pune school) बाहेर कोयत्याने हल्ला चढवला. या विद्यार्थ्याने केलेल्या प्रतिहल्ल्यात हल्ल्ला करणारा एक तरुणही जखमी झाला आहे. कोयत्यांच्या वापर आता शाळांच्या दरवाजापर्यंत येऊन पोहोचल्याने सगळ्यांकडूनच चिंता व्यक्त होत आहे.
पुण्यात (Pune) धुमाकूळ घालणाऱ्या कोयता गँगचे गॅंगवॉर (Pune Koyta Gang) आज नारायण पेठेतील नूतन मराठी विद्यालयापर्यंत पोहचले. आपल्या मैत्रिणीकडे का बघतो या रागातून दोन तरुणांनी नूतन मराठी विद्यालयात शिकणाऱ्या विराज आरडे नावाच्या युवकावर कोयत्याने (Pune Koyta Gang) हल्ल्ला चढवला. विराजच्या दिशेने फेकलेला कोयता त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला लागल्याने तो जखमी झाला आहे. त्यानंतर तोच कोयता विराजने हल्ला करणाऱ्यांवर फेकल्याने त्यात समीर पठाण नावाचा तरुण जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश भंडारी नावाच्या तरुणाची मैत्रीण नूतन मराठी विद्यालयात शिकते. विराज तिच्याकडे बघतो असा गणेश भंडारीला संशय होता. त्यातून आज सकाळी साडेसात वाजता गणेश आणि विराजमध्ये आधी बाचाबाची झाली. त्यानंतर गणेश त्याचा मित्र समीर पठाण आणि इतरांना घेऊन पुन्हा नु म वी शाळेजवळ आला. शाळा सुटताच बाहेर आलेल्या विराजवर गणेश आणि त्याच्या मित्रांनी हल्ला चढवला. शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांशिवाय वावरणाऱ्या इतरांचं प्रमाण जास्त वाढल्यानं असे प्रकार घडत असल्याचं शाळेतल्या शिक्षकांचं म्हणणं आहे.
दरम्यान, असा एकही दिवस जात नाही ज्या दिवशी पुण्यात कोणा ना कोणावर कोयत्याने हल्ला झालेला नाही. असे हे होणारे हल्ले रोखण्यासाठी पोलिसांनी अनेक उपाय करून पाहिलेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून झाली आहे. कोयते जप्त करून झालेत पण कोयत्यांची दहशत काही कमी होत नाही. फक्त पोलिसांसाठीच नाही तर सर्वांसाठी ही चिंतेची बाब आहे.
नवीन कोयता गँग का उदयास येतायत? याचं कारण तरुणांची बदललेली मानसिकता आणि बदलेल्या मानसिकतेकडे त्यांच्या पालकांचं आणि समाजाचं झालेलं दुर्लक्ष. बदलेल्या या मानसिकतेला बदलण्यासाठी जोपर्यंत प्रयत्न होणार नाहीत तोपर्यंत पोलिसांच्या कारवाईने कोयता गँग रोखल्या जातीलच, याबाबत शंका व्यक्त होत आहेत.
इतर बातम्या: