(Source: Poll of Polls)
Pune Corona Restrictions : लसीचे दोन डोस घेतले असतील तरच लोणावळ्यासह मावळ तालुक्यात मिळणार प्रवेश, अन्यथा....!
Pune Corona Restrictions : पुण्यातील (Pune) प्रसिद्ध पर्यटनस्थळी म्हणजे लोणावळ्यात (Lonavala) लसीचे दोन डोस घेतले असतील तरच प्रवेश मिळणार आहे.
Pune Corona Restrictions : पुण्यातील (Pune) प्रसिद्ध पर्यटनस्थळी म्हणजे लोणावळ्यात (Lonavala) लसीचे दोन डोस घेतले असतील तरच प्रवेश मिळणार आहे. यासाठी प्रशासनाकडून मुंबई आणि पुण्याच्या एन्ट्री पॉइंटवर चेक पोस्ट लावण्यात येणार आहेत. सोमवारी 17 जानेवारीपासून याची अंमलबजावणी सुरू होईल. शिवाय ज्यांनी दुसरा डोस घेतला नसेल आणि त्यांची मुदत ओलांडली असेल तर नाक्यावरच त्या व्यक्तीस लस टोचली जाणार आहे.
वडगाव मावळ तालुक्यातील लोणावळ्यासह कामशेत, कान्हे रेल्वे गेट, वडगाव आणि तळेगावच्या एन्ट्री पॉइंटवर ही अशीच नाकाबंदी करण्यात येणार आहे. दिवसेंदिवस तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागलेत, त्यामुळेच ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आठशे पार गेली आहे.
कोरोनाचा विळखा वाढू लागल्याने तालुका प्रांताधिकाऱ्यांनी अशी खबरदारीची पावलं उचलली आहेत. एन्ट्री पॉइंटच्या प्रत्येक चेकपोस्टवर नगरपंचायत आणि नगरपरिषद प्रशासनाच्या मदतीला पोलीस ही तैनात असतील. ते प्रत्येक व्यक्तीला चेक पोस्टवर रोखणार आहेत.
त्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेत का? एकच डोस घेतलाय आणि त्यांची दुसऱ्या डोसची मुदत संपलीये का? किंवा आत्तापर्यंत लसच घेतली नाही याची पडताळणी केली जाईल. शिवाय लस न घेतलेल्यांना चेक पोस्टवरच लस टोचण्यात येणार आहे.
काल राज्यात कोरोनाच्या 42,462 नव्या रुग्णांची भर
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होत आहे. काल राज्यात कोरोनाच्या 42,462 नव्या रुग्णांची भर झाली असून 23 जणांचा मृत्यू झाला आहे. काल राज्यात 39,646 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सलगपणे राज्यात 40 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होतेय. त्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यात काल 125 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 1730 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 879 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.