Pune Bypoll election : दिव्यांग मतदारांसाठी महत्वाची बातमी, ओळखपत्र अन् अॅपबाबत महत्वाचा निर्णय
Pune Bypoll election : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
Pune Bypoll election : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र नसल्यास निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्यापैकी एक पुरावा ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. यात केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने दिलेल्या दिव्यांगत्व ओळखपत्राचादेखील समावेश केला आहे. त्याशिवाय दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्यूडी ॲपची सुविधा देण्यात येणार आहे.
ओळखीसाठी कोणते बारा पुरावे ?
मतदान करतांना मतदार छायाचित्र ओळखपत्र सोबत असणे गरजेचे आहे. असे ओळखपत्र नसल्यास ओळख पटविण्यासाठी आधारकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, बँकांचे/टपाल कार्यालयाचे छायाचित्र असलेले पासबुक, श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स), पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय) द्वारा जारी केलेले स्मार्टकार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले छायाचित्रासह सेवा ओळखपत्र, खासदार, आमदार यांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र आणि केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने दिलेले दिव्यांगत्वाचे ओळखत्र (युनिक डिसेबिलीटी आयडी) यापैकी कोणत्याही एक पुरावा मतदान केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे. मतदार यादीवरून मतदाराची ओळख निश्चित होत नसल्यास मतदार छायाचित्र ओळखपत्र किंवा वरील 12 पैकी एक पुरावा ग्राह्य धरण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. परदेशातील मतदारांना केवळ ओळखीसाठी त्यांचा मूळ भारतीय पासपोर्ट सादर करावा लागेल.
दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्युडी ॲपची सुविधा
दिव्यांग व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना सुलभरीत्या मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने ‘पीडब्ल्यूडी ॲप’(सक्षम-ईसीआय) तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली आहे. कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदार निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहता कामा नये, यासाठी दोन्ही मतदारसंघात मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध नागरिक, शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती यांना प्रवृत्त करून मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी आणि परत जाण्यासाठी साह्य करण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचे काम या माध्यमातून होत आहे.
‘मतदान प्रक्रियेपासून दिव्यांग व्यक्ती वंचित राहू नयेत, तसेच त्यांना मतदान करताना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासन विशेष सोयी-सवलती उपलब्ध करून देणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्पची व्यवस्था, व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. दिव्यांग मतदारांना पोस्टल मतदनाची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली असून त्यांच्याकडून नमुना अर्ज 12-ड भरून घेण्यात येत आहेत. मतदान केंद्रांवरील दिव्यांग मतदारांची एकूण संख्या विचारात घेऊन अशा मतदारांसाठी आवश्यक त्या सुविधा जिल्हा प्रशासन उपलब्ध करून देणार आहे. अंध व दृष्टी अधू असलेल्या मतदारांसाठी काचेचे भिंग, ब्रेल लिपीतील मतपत्रिका देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे.