Pune Bypoll election : रविंद्र धंगेकरांचे आरोप बिनबुडाचे; भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीकांचा हल्लाबोल
कसब्यातील सगळ्या मतदारांचा अपमान आहे.रविंद्र धंगेकरांचे हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत, अशी प्रतिक्रिया पुणे शहर भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला आहे.
Pune Bypoll election : कसबा मतदार संघात (Pune Bypoll Election) मतदारांनी मतांसाठी पैसे घेतले असा थेट आरोप कॉंग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला आहेत. हा कसब्यातील सगळ्या मतदारांचा अपमान आहे, हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत, अशी प्रतिक्रिया पुणे शहर भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला आहे. असे खोटे आरोप भाजपच्या उमेदवारावर करुन फक्त सहानुभूती निर्माण करण्याचं काम ते करत असल्याचंही मुळीक म्हणाले.
भारतीय जनता पक्षानं (BJP) पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसचे कसबा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. याचा निषेध करण्यासाठी धंगेकर आज (25 फेब्रुवारी) कसबा गणपतीसमोर उपोषण करत आहेत. कसबा पेठेतील रविवार पेठ, गंजपेठ आणि बहुतांश भागात भाजपकडून पैशाचे वाटप सुरू केले आहे. या संपूर्ण प्रकारात पोलिसही सहभागी असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे. त्यावर भाजपने हल्लाबोल केला आहे.
जगदीश मुळीक म्हणाले की, धंगेकरांनी मतदारांवर केलेले सगळे आरोप खोटे आहेत. कसब्यातील मतदार सुज्ञ आहेत. कसब्यातील मतदारांनी मतदानासाठी पैसे घेतले असे आरोप धंगेकरांनी केले आहेत. हा आरोप करुन धंगेकर मतदारांचा अपमान करत आहेत. मतदारांचा हा अपमान भाजप सहन करणार नसल्याचं ते म्हणाले. काल पाच वाजता प्रचार बंद झाल्यावर धंगेकरांनी हा खोटा आरोप करुन सहानुभूमी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
उपोषणाला बसून स्टंटबाजी करुन धंगेकर प्रचार करत आहेत. त्यामुळे प्रचार संपला असताना असं काही कृत्य करुन चर्तेत राहण्याचा प्रयत्न आहे. भाजप धंगेकरांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असा इशारा मुळीक यांनी दिला आहे. त्याचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी देखील करणार असल्याचं ते म्हणाले. विरोधी पक्षाच्या उमेदवाराने स्वतःच्या प्रचारासाठी खोटे आरोप करून उपोषण करून नागरीकांची दिशाभूल करत आहेत. त्याबद्दल त्यांना बाप्पानी सद्बुद्धी द्यावी या करता दगडूशेठ गणपतीची महाआरती आयोजित केली आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, काल चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी रोड शो केला. त्यानंतर त्यांनी भाजपच (BJP) जिंकणार असा विश्वास व्यक्त केला. काल दिवसभर भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार करण्यात आला. दोन्ही पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी रोड शो, पदयात्रा, शक्तीप्रदर्शन आणि घरोघरी जाऊन भेटी घेण्यावर भर दिला.