Pune Bridge Collapse : इंद्रायणीवरील कुंडमळा पूल कोसळण्याला जबाबदार कोण? कुणाची काय जबाबदारी? महाराष्ट्राला पडलेले प्रश्न
Indrayani River Bridge Collapse : कुंडमळा पुलावर बांधण्यात येणाऱ्या नवीन पुलाचं टेंडर 10 जून रोजी काढण्यात आलं होतं. वर्क ऑर्डरची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण काम सुरू करण्यात आलं नाही.

पुणे : मावळमधील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून चार पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन पुरुषांसह एका लहान मुलाचाही समावेश आहे. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. सध्या कुणीही बेपत्ता नाही मात्र खबरदारी म्हणून इंद्रायणी नदीची ड्रोनद्वारे पाहणी केली जात आहे. खबरदारी म्हणून बोटीतून सर्च ऑपरेशनही सुरू आहे.
कुंडमळ्याच्या घटनेत आतापर्यंत एकूण 51 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. आठ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर इतर 32 जण किरकोळ जखमी आहेत. दरम्यान, हा पूल धोकादायक असल्याचा फलक लावण्यात आला होता. मात्र पर्यायी मार्ग नसल्यानं स्थानिकांना याच पुलाचा वापर करावा लागला. त्यामुळे या दुर्घटनेला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे.
Pune River Bridge Collapses : कुंडमळ्याच्या घटनेला जबाबदार कोण?
मेंटेनन्स कोणाकडे? - जिल्हा प्रशासन बांधकाम विभागाकडे पुलाच्या मेंटेनन्सची जबाबदारी होती.
पूल कोणाच्या वापरासाठी? - कान्हेवाडी, इंदोरी, शेलारवस्ती आणि कुंडमळा वस्तीतील नागरिकांना पायी वापरासाठी होता. मात्र दुचाकीवरुनही प्रवास केला जायचा.
बंद करण्याचा निर्णय - दीड वर्षांपूर्वी पूल वापरासाठी बंद करण्यात आला होता. इंदोरी गावचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाने तसे सूचना फलक लावण्यात आले.
पर्यायी व्यवस्था काय? - हा पूल जर बंद झाला तर 8 ते 9 किलोमीटरचा वळसा मारुन, साधारण 20 ते 25 मिनिटांचा प्रवास करुन जावं लागत.
पर्यटक जाऊ न देण्याची जबाबदारी कोणाची? - ग्रामपंचायतीने दोन्ही बाजूंनी सूचना फलक लावले होते. त्याव्यतिरिक्त सुट्ट्यांदिवशी पोलिसांनी लक्ष देणे अपेक्षित होतं. मात्र पर्यटक स्थानिकांसह पोलिसांना ही जुमानत नव्हते असं ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे. लोक जात आहेत तर ते खाली पडू नयेत, म्हणून पुलावरील लोखंडी भागात संरक्षण जाळ्या लावण्यात आल्या होत्या.
नवा पूल उभारण्यात दिरंगाई? - 11 जुलै 2024ला नव्या पुलाच्या कामाला मंजुरी देण्यात आली असं पत्र तत्कालीन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मावळचे भाजप नेते रवींद्र भेगडेंना दिलं होतं. प्रत्यक्षात 10 जून 2025ला काम सुरु करण्याचे आदेश पत्र ही निघाले. मात्र अद्याप कामाला सुरुवात नाही.
Indrayani River Bridge Collapses : नेमकं काय घडलं?
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने मावळ तालुक्यातला कुंडमळा परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली होती. काही उत्साही पर्यटक प्रवेशबंदी असलेल्या कमकुवत पुलावर जमले. तर काही महाभागांनी दुचाकीही पुलावर चढवल्याची माहिती समोर आली आहे. आधीच धोकादायक बनलेला पूल गर्दीमुळं कोसळला. पाण्यात पडलेल्या 50 हून अधिक पर्यटकांना वाचवण्यात यश आलं. या घटनेत चार पर्यंटकांचा बुडून मृत्यू झाला.
ही बातमी वाचा:


















