(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Girish Bapat Death : खासदार गिरीश बापट अनंतात विलीन; पुणेकरांनी साश्रु नयनांनी दिला अखेरचा निरोप
पुण्याचे लाकडे खासदार गिरीश बापट अनंतात विलिन झाले. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Girish Bapat Death : पुण्याचे लाकडे खासदार गिरीश बापट अनंतात विलिन झाले. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी स्मशानभूमीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रकाश जावडेकर, मंत्री चंद्रकांत पाटील, पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते. राष्ट्रवादीचे स्थानिक नेतेही उपस्थित होते. राजकीय नेत्यासोबतच पुणेकरांनी साश्रु नयनांनी बापटांना निरोप दिला.
गिरीश बापट हे गेल्या अनेक महिन्यांपासून दुर्धर आजाराशी झुंज देत होते. आज सकाळी त्यांची प्रकृती ढासळली. त्यामुळं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. पुण्यात तीन टर्म नगरसेवक, पाच टर्म आमदार आणि 2019 सासापासून खासदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द होती. मनमिळाऊ स्वभाव आणि सर्वसमावेशकता ही त्यांच्या नेतृत्त्वशैलीची ओळख होती. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारानं ग्रस्त असूनही गिरीश बापट हे कसबा पेठ पोटनिवडणुकीत व्हीलचेअर बसून भाजपच्या प्रचारात सक्रिय झाले होते. गेल्या महिन्यात कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात गिरीश बापट यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवादही साधला होता. त्यावेळी त्यांचं भावनिक आवाहन ऐकून अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते.
पुण्यातील शनिवार पेठेत त्यांचं घर आहे. या घराच्या आवारत अनेक नागरिकांनी गर्दी केली होती. 'गिरीश बापट अमर रहे', अशा घोषणा कार्यकर्ते पाणावलेल्या डोळ्यांनी दिल्या आहेत. गिरीश बापट यांच्या पश्चात पत्नी गिरीजा, मुलगा गौरव आणि सून स्वरदा आणि नात असा परिवार आहे. त्यांचं सांत्वन करण्यासाठी अनेकांची रीघ लागली होती.
पाणावलेल्या डोळ्यांनी दिला कुटुंबियांनी निरोप..
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री प्रकाश जावडेकर, मंत्री चंद्रकांत पाटील, पत्नी गिरीजा बापट, मुलगा गौरव बापट, सून स्वरदा बापट, बहिण माधुरी गोखले, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी साश्रु नयनांची बापटांना निरोप दिला. मुलगा आणि सून दोघेही पेशाने वकील आहेत. सून राजकारणात सक्रिय आहे.
शरद पवारांनी घेतलं अंत्यदर्शन
गिरीश बापट यांची सर्वसमावेशक नेता अशी ओळख होती. त्यामुळे सकाळी त्यांच्या निधनाची बातमी कळताच राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांना अश्रु अनावर झाले होते. राष्ट्रावादीचे स्थानिक नेते दिवसभर बापटांच्या निवासस्थानी उपस्थित होते. त्यासोबतच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीदेखील 5 वाजताच्या सुमारास गिरीश बापट यांच्या शनिवार पेठेतील निवासस्थानी जाऊन त्याचं अंत्यदर्शन घेतलं होतं.