पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक
बिहार एटीएसने पुणे एटीएसच्या मदतीने ही कारवाई केली आहे. पुण्याच्या चाकणमधून ही शरियतला अटक करण्यात आली आहे.
पुणे : पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे. जवानांच्या पोस्टिंग डिटेल्सची प्रिंट जवळ बाळगणाऱ्या संशयित दहशतवाद्यांच्या साथीदाराला पुण्यातील चाकण परिसरातून बिहार एटीएसने अटक केली आहे.
शरियत मंडल असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी बिहारमधून एटीएसने दोघा दहशतवाद्यांना अटक केली होती. बिहारमधून अटक केलेले खैरुल मंडल आणि अबू सुलतान हे दोघेही बांगलादेशी आहे, तर शरियत हा भारतीय आहे. शरियत पुण्यातील चाकणमध्ये राहत होता.
खैरुल मंडल आणि अबू सुलतान यांची बिहार एटीएसने चौकशी केली असता चौकशीतून शरियतची माहिती समोर आली. त्यानंतर बिहार एटीएसने पुणे एटीएसच्या मदतीने शरियतला अटक केली. आता शरियतला चौकशीसाठी बिहार नेण्यात आलं आहे.
बिहारमधून अटक केलेले खैरुल मंडल आणि अबू सुलतान हे इस्लामिक स्टेट बांगलादेश आणि आयसिस सह जमात-उल-मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे सक्रीय सदस्य आहेत. तर शरियत चाकमध्ये बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. शरियत खैरुल आणि अबू सुलतानच्या संपर्कात होता, अशी माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे.
पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद
पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्याला निशाणा बनवण्यात आलं होतं. लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. तब्बल 200 किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.