Pune PMPML : PMPML च्या धडकेत मृत्यू झालेल्या उद्योजकाच्या कुटुंबीयांना अडीच कोटी रुपयांची नुकसान भरपाई
पीएमपीच्या धडकेत मृत्यू झालेल्या उद्योजकाच्या कुटुंबीयांना अडीच कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. मोटार अपघात न्यायाधिकरणाने हे आदेश दिला आहे.
पुणे : पुण्यात पीएमपीचे अपघात चांगलेच (PMPML Bus) वाढले आहेत. अनेक अपघात हे चालकांच्या निष्काळजीपणामुळे होत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. त्यातच आता पीएमपीच्या धडकेत मृत्यू झालेल्या उद्योजकाच्या कुटुंबीयांना अडीच कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. मोटार अपघात न्यायाधिकरणाने हे आदेश दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जून 2018 मध्ये चुकीच्या दिशेने आलेल्या पीएमपीने उद्योजक धीरेन शिवप्रसाद तिवारी यांच्या कारला धडक दिली होती. अपघातात तिवारी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यासाठी तिवारी यांच्या कुटुंबीयांनी बसचालक रमेश वाघमारे, पीएमपी प्रशासन, विमा कंपनीविरुद्ध दावा दाखल केला होता
मोटार अपघात न्यायाधिकरणात दाव्यावर सुनावणी झाली. अपघात पीएमपी बसचालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे निरीक्षक न्यायाधीश यांनी नोंदवलं. तिवारी यांचे वय, त्यांचे उत्पन्न, त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंब या बाबी विचारात घेऊन न्यायाधिकरणाने अडीच कोटी रुपयांचे नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.
अपघाताच्या संख्येत दुपटीनं वाढ
PMPML अपघाताच्या संख्येत आणि यात होणाऱ्या मृत्यूच्या आकडा दुपटीने वाढला असल्याचं समोर आलं आहे. बसचे एप्रिल ते सप्टेंबर 2022 दरम्यान 59 अपघात झाले होते. यात आठ जणांचा मृत्यू झाला होता. तर 2023 मध्ये हा आकडा दुपटीने वाढला आहे. पीएमपीचे एकूण 75 अपघात झाले. यात 19 जणांचा मृत्यू झाला. चालकांच्या हलगर्जीपणामुळे आणि चालकांच्या निष्काळजीपणामुळे हे अपघात वाढतं असल्याची माहिती आहे.
PMPML चालकांना सूट?
पीएमपीचे चालक सिग्नल जम्पिंग, भरधाव वेगाने बस चालविणे, झेंब्रा क्रॉसिंगवर बस थांबवणे अशा विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येतात. पण, सर्वसामान्य वाहनचालकांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जो कारवाईचा दंडुका उगारला जातो. तो मात्र पीएमपी चालकांच्या बाबत उगारल्याचे दिसून येत नाही.
PMPML चालकांना कठोर नियम
कामावर असताना कोणत्याही प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये, असे आदेश दिलेले आहेत. चालक आणि वाहकांची नियमित तपासणी झाल्यास पीएमपी बसच्या अपघाताचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होणार आहे. सुरुवातीला PMPML बस चालक आणि कंडक्टरची ब्रेथ ॲनालायझरने तपासणी व्हायची मात्र काही दिवसांपूर्वी ही तपासणी होत नसल्याचं समोर आलं. नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटल्या आहेत.
इतर महत्वाची बातमी-
Pune Metro trial : इतिहासात पहिल्यांदाच मुठा नदीच्या गर्भातून धावली पुणे मेट्रो; पाहा व्हिडीओ...