Pune News : ‘आय लव्ह’ फलकावर अखेर महापालिकेची कारवाई; पुण्याची बदनामी करत असल्याचं पालिकेचं मत
पुण्यात सुशोभिकरणासाठी लावण्यात आलेल्या “आय लव्ह… पुणे” यासारख्या डिजीटल फलकांवर कारवाई करण्याचे आदेश पुणे महापालिकेने दिले आहे.
Pune News : पुण्यात सुशोभिकरणासाठी लावण्यात आलेल्या (Pune) “आय लव्ह… पुणे” (I Love Boards) या डिजिटल फलकांवर कारवाई करण्याचे आदेश पुणे महापालिकेने (PMC) दिले आहे. मागील काही वर्षात पुणे शहरात अनेक परिसरात 'आय लव्ह ...' चे फलक लावण्यात आले आहेत. या फलकांबाबत अनेकांकडून तक्रारी आल्या होत्या या तक्रारींची दखल घेत अखेर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या फलकावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
या फलकांपैकी अनेक फलक पुणेकरांच्या निधीचा वापर करुन आणि नगरसेवकांची परवानगी न घेता लावण्यात आले आहेत. त्यामुळे हे आदेश देण्यात आले आहे. सारसबाग, कात्रज, कोरेगाव पार्क, महंमदवाडी, स्वारगेट, वारजे, औंध आणि येरवडा या भागात हे फलक लावण्यात आले आहेत.
मार्चमध्ये सर्वसाधारण सभेचा कार्यकाळ संपला त्यानंतर प्रशासक म्हणून विक्रम कुमार कार्यरत आहे. प्रशासकीय राज सुरु झाल्यावर पहिल्याच दिवशी अतिक्रमणावर त्यांनी कारवाईचा तडाखा लावला होता. पुण्यातील अनेक परिसरातील अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले होते. धानोरी, डेक्कन या परिसरात अतिक्रमणाची मोठी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा विक्रम कुमार अॅक्शन मोडवर आले आहेत. शहराचं सौंदर्य दाखवणारे हे डिजिटल फलक त्या परिसराची बदनामी करत आहे. त्यामुळे त्यांनी सर्व प्रभाग कार्यलयातील बिल्डिंग विभागांना अशा प्रकारच्या फलकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
फलकासाठी पुणेकरांच्या वीजेचा वापर
या फलकांबाबत नागरिकांच्या विविध तक्रारी आहेत. नागरिक विविध ठिकाणी वारंवार या समस्या मांडत आहेत. प्रसारमाध्यमांनीही त्यांच्यावर अनेकदा बातम्या प्रसारित केल्या आहेत. यामुळे महापालिका आयुक्तांनी चौकशी करण्यास सांगितलं आहे. हे सर्व फलक संबंधित विभागाची अनिवार्य परवानगी न घेता बसविण्यात आल्याचे आढळून आलं आहे. फलक सार्वजनिक पुणेकरांची वीज वापरत असल्याचंदेखील आढळून आले आहे. अहवाल आल्यानंतर महापालिका आयुक्तांनी अशा सर्व फलकांवर कारवाई करण्यास सांगितले आहे. सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांना कारवाई अहवाल आयुक्त कार्यालयात सादर करण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त कुणाल खेमनार यांनी लेखी आदेश काढत दिली आहे.
अतिउत्साहात लावले फलक पण परवानगीचं काय?
आगामी निवणुकीसाठी अनेकांकडून अशा पद्धतीचे फलक लावण्यात आले आहे. शिवाय त्यावर नावं देखील लिहिण्यात आले आहे. विद्यमान सदस्यांचा आणि इच्छुक असलेल्यांनीही अशा प्रकारचे फलक आपल्या परिसरात लावले आहेत. मात्र त्यांनी विद्युत पुरवठ्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) किंवा PMC यांच्या परवानगीशिवाय लावण्यात आल्याने त्यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहे.