PM Narendra Modi Pune Visit : मोदींच्या पुणे दौऱ्यात कर्जत जामखेड MIDC मंजुरीचे फलक; मंजुरीसाठी तरुण रस्त्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या पुणे दौऱ्यात कर्जत जामखेड एमआयडीसी मंजुरी रखडल्याबाबतचे फलक कर्जत-जामखेड मतदारसंघातील युवांनी झळकावल्याने सध्या कर्जत जामखेड एमआयडीसीचा मुद्दा केंद्रीय पातळीवर गेल्याचं पाहायला मिळत आहे
PM Narendra Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या पुणे दौऱ्यात कर्जत जामखेड एमआयडीसी मंजुरी रखडल्याबाबतचे फलक कर्जत-जामखेड मतदारसंघातील युवांनी झळकावल्याने सध्या कर्जत जामखेड एमआयडीसीचा मुद्दा केंद्रीय पातळीवर गेल्याचं पाहायला मिळत आहे. या फलकांनीच सर्वांचं लक्ष वेधून घेतले. दगडूशेठ मंदिराजवळ हे फलक पाहायला मिळाले.
या फलकांवर आदरणीय मोदी साहेब महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्र शासन हे कर्जत - जामखेड येथील एमआयडीसी संदर्भात वेळकाढूपणा करत आहे. आपण देशाचे मोठे नेते आहात युवकांचा विचार करून एमआयडीसी संदर्भात तातडीने योग्य निर्देश देऊन मान्यता द्यावी ही विनंती. सर्वसामान्य युवक कर्जत जामखेड, अशा पद्धतीने मजकूर लिहिलेला फलक हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात दाखवण्यात आले.
एकीकडे राज्य सरकार कर्जत जामखेडच्या एमआयडीसीला अधिसूचना काढून मंजुरी देत नसतानाच दुसरीकडे आता थेट पंतप्रधान मोदींनाच मंजुरी बाबतची विनंती केल्याने एकच चर्चा रंगली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच कर्जत जामखेड मतदारसंघातील युवकांनी मंजुरीसाठी साकडे घातल्याने सध्या याचीच सर्वत्र चर्चा रंगली आहे.
एकीकडे विरोध तर दुसरीकडे जंगी स्वागत...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याचा एकीकडे विरोधकांकडून काळे झेंडे दाखवून निषेध होत असताना, दुसरीकडे सर्वसामान्य पुणेकरांनी मात्र पंतप्रधान मोदींचं ठिकठिकाणी जंगी स्वागत केलं. पंतप्रधानांच्या या दौऱ्यानिमित्त पुण्यातल्या नागरिकांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन मंदिरात अभिषेक आणि पूजा केली. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींची एक झलक पाहता यावी यासाठी पुणेकरांनी सकाळपासून रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. मोदींची छबी आपल्या मोबाईलमध्ये टिपता यावी यासाठी प्रत्येक ठिकाणी बच्चेकंपनीपासून ज्येष्ठांची झुंबड उडाली होती. आपल्या पंतप्रधानांना डोळे भरून पाहता यावं असा उत्साह विविध वयोगटाच्या महिलांमध्येही दिसला. पंतप्रधानांच्या या पुणे भेटीनं अनेक महिला भावूक झाल्याचंही दिसलं. साधारण चार तासांच्या या दौऱ्यात पंतप्रधान जिथं जिथं गेले, त्या ठिकाणी मोदींच्या नावानं घोषणा ऐकायला मिळाल्या. आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी भाजपविरोधात देशातील विरोधी पक्ष एका व्यासपीठावर येत असताना, मोदींच्या लोकप्रियतेची जादूही अजून कायम असल्याचं त्यांच्या पुणे दौऱ्यात दिसून आलं.
हेही वाचा-