(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Metro : अखेर पुणेकरांसाठी मेट्रो सुसाट; मोदींच्या हस्ते मेट्रोच्या दोन मार्गिकांचं लोकार्पण, तिकीट दर किती अन् काय आहेत वैशिष्ट्ये?
पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील दोन मार्गिकांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि रुबी हॉल ते गरवारे या दोन मार्गिका महत्वाच्या मानल्या जातात.
PM Narendra Modi Pune metro : पुणे मेट्रोच्या (Pune metro) दुसऱ्या टप्प्यातील दोन मार्गिकांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांच्या हस्ते करण्यात आलं. पिंपरी-चिंचवड आणि पुण्याला जोडणाऱ्या फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि रुबी हॉल ते गरवारे या दोन मार्गिका महत्वाच्या मानल्या जातात. मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या मार्गिकांचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. या मेट्रोमुळे पुणेकरांना मोठा फायदा होणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
या नवीन मार्गाच्या लोकार्पणामुळे पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट आणि वनाझ ते रुबी हॉल या मार्गांवर प्रवास करणे शक्य होणार आहे. मेट्रोचे किमान भाडे 10रुपये असून कमाल भाडे 35 रुपये असणार आहे. पीसीएमसी ते वनाझ असा प्रवास करण्यासाठी 40 मिनिटे लागणार आहेत आणि त्यासाठी 35 रुपये भाडे लागेल तसेच पीसीएमसी ते रुबी हॉल यासाठी 30 रुपये भाडे असेल. वनाझ ते रुबी हॉल यासाठी 35 रुपये भाडे असेल. विद्यार्थ्यांसाठी भाड्यामधे 30 टक्के सवलत असणार आहे. शनिवार रविवार सर्व नागरिकांसाठी 30 टक्के सवलत असणार आहे तसेच मेट्रो कार्ड धारकांसाठी सरसकट 10 टक्के सवलत असणार आहे. मेट्रो कार्ड लवकरच विक्रीस उपलब्ध होणार आहे, असं मेट्रोकडून सांगण्यात आलं आहे.
पुणे मेट्रोची वैशिष्ट्य-
- सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत दोन्ही मार्गांवर मेट्रो सेवा सुरु राहणार.
- गर्दीच्या वेळेत दर 10 मिनिटांनी प्रवाशांना मेट्रो उपलब्ध होणार.
- 12 ते 4 या वेळेत दर 15 मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असणार.
दोन वेगळ्या कंपन्यांकडून मेट्रोचं काम सुरु
पुण्यात पुणे मेट्रो आणि पीएमआरडीए मेट्रो अशा दोन वेगळ्या कंपन्यांकडून वेगवेगळ्या मार्गावर मेट्रोची कामे सुरु आहेत. पुणे मेट्रोकडून पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट हा 16.59 किलोमीटरचा आणि वनाझ ते रामवाडी हा 14.66 किलोमीटर हे दोन मार्ग तयार करण्यात येत आहेत. तर पीएमआरडीए मेट्रोकडून राजीव गांधी हिंजवडी आय टी पार्क ते शिवाजीनगर जिल्हा न्यायालयापर्यंत 23.33 किलोमीटरचा मार्ग तयार करण्यात येत आहे.
रुबी हॉलपासून रामवाडी आणि शिवाजीनगर ते स्वारगेट या मार्गाचे काम बाकी
वनाझ ते गरवारे कॉलेज पर्यंतच्या मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दीड वर्षांपूर्वी झाले होते. आज मोदींच्या हस्ते गरवारे कॉलेज-शिवाजीनगर न्यायालय ते रुबी हॉल क्लिनिकपर्यंतच्या मार्गाचे उद्घाटन झाले. तर पिंपरी-चिंचवडच्या फुगेवाडीपासून शिवाजीनगर न्यायालयपर्यंतच्या मार्गाचे उद्घाटन देखील झाले. मेट्रोचे अजून रुबी हॉलपासून रामवाडी आणि शिवाजीनगर ते स्वारगेट या मार्गाचे काम अद्याप बाकी आहे.
पुणे मेट्रोचे तिकीट दर -
■ वनाझ ते रुबी हॉल : ₹ 25
■ पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट : ₹ 30
■ वनाझ ते पिंपरी-चिंचवड : ₹ 35
■ रुबी हॉल ते पिंपरी-चिंचवड : ₹ 30
■ वनाझ ते डेक्कन जिमखाना/संभाजी उद्यान/पीएमसी: ₹ 20
■ वनाझ ते शिवाजीनगर/सिव्हिल कोर्ट/रेल्वे स्टेशन: ₹ 25
■ रुबी हॉल ते शिवाजीनगर: ₹ 15
■ रुबी हॉल ते डेक्कन जिमखाना : ₹ 20
■ पिंपरी-चिंचवड ते पीएमसी/पुणे रेल्वे स्टेशन : ₹ 30
हेही वाचा-