(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णाचा व्हायरल व्हिडीओ मॉकड्रिलचा भाग
पुणे शहरातील तीन ते चार ठिकाणी अशाप्रकारे हे मॉकड्रिल घेण्यात आले होते. याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. हा प्रकार खरा असावा असा अनेकांचा समज झाला. परंतु हा प्रकार मॉकड्रिलचा भाग होता.
पुणे : पुण्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आज रस्त्यावर पडलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. कोरोनाग्रस्त रुग्णांची अवस्था किती वाईट आहे असा भ्रम निर्माण हा व्हिडीओ पाहून निर्माण होईल. परंतु हा व्हिडीओ मॉकड्रिलचा भाग होता. कोरोनाबाबत प्रबोधन करण्यासाठी पालिकेकडून हा डेमो घेण्यात आला होता.
डेक्कन परिसरातील खंडोजी बाबा चौकात आज दुपारच्या सुमारास एक कोरोनाग्रस्त रुग्ण रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत दिसला. त्रास होत असल्यामुळे तो लोळण घेत असल्याचे दिसत होते. हे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दीही जमली होती. तर महापालिकेचे सफाई कर्मचारी तेथे स्वछता करताना दिसत आहेत.
याच दरम्यान घाईगडबडीत एक रुग्णवाहिका त्या ठिकाणी येते. पीपीई किट घातलेले काही कर्मचारी लगबगीने खाली उतरतात. रुग्णवाहिकेतून स्ट्रेचर काढून गडबड करीत त्या रुग्णाला त्यावर चढवतात. तितक्याच चपळाईने रुग्णवाहिकेत टाकून रुग्णवाहिका निघून जाते. त्यानंतर लगेच महापालिकेचा सफाई कर्मचारी येऊन ती जागा सॅनिटाईझ करून निघून जातो..अशाप्रकारचं ते मॉकड्रिल होतं.
पुण्यात आज डेक्कन परिसरात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल करण्यात आले होते. सर्व यंत्रणांची सतर्कता तपासण्यासाठी हे मॉक ड्रिल करण्यात येत असते. मात्र या व्हिडीओचा वापर करुन वेगळ्या अर्थाने समाजमाध्यमांमध्ये पसरवला जात आहे. कृपया आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी ! pic.twitter.com/EPHYBR5Bv6
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 23, 2020
पुणे शहरातील तीन ते चार ठिकाणी अशाप्रकारे हे मॉकड्रिल घेण्यात आले होते. याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. हा प्रकार खरा असावा असा अनेकांचा समज झाला. परंतु हा प्रकार मॉकड्रिलचा भाग होता. अशा प्रकारचा रुग्ण आढळल्यास पालिकेची मदत पोहोचण्यास किती वेळ लागतो हे पाहण्यासाठी डेमो घेण्यात आला होता.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही याप्रकरणी ट्विट करून माहिती दिली आहे. "पुण्यात आज डेक्कन परिसरात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल करण्यात आले होते. सर्व यंत्रणांची सतर्कता तपासण्यासाठी हे मॉक ड्रिल करण्यात येत असते. मात्र या व्हिडीओचा वापर करुन वेगळ्या अर्थाने समाजमाध्यमांमध्ये पसरवला जात आहे. कृपया आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी" असे आवाहन केले आहे.