Pune News : पुणे विमानतळावरील ‘मल्टीलेव्हल पार्किंग’ प्रायोगिक तत्वावर सुरु; प्रवाशांचा पार्किंगचा ताप कमी होणार
पुणे विमानतळावरील ‘मल्टीलेव्हल पार्किंग’ प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आले आहे. विमानतळावरील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी हे पार्किंग उभारण्यात आलं आहे.
Pune News : पुणे विमानतळावरील 'मल्टीलेव्हल पार्किंग' प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आले आहे. विमानतळावरील पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी हे पार्किंग उभारण्यात आलं आहे. मागील अनेक दिवसांपासून पुणे विमानतळावर चारचाकी आणि दुचाकी यांच्या पार्किंगची मोठी समस्या नागरिकांना भेडसावत होती. ही समस्या सोडवण्यासाठी या विमानतळाच्या पार्किंगचं नियोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार प्रवाशांना हे पार्किंग उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.
मल्टीलेव्हल पार्किंग सुविधा एप्रिल 2022 पर्यंत पूर्ण करायची होती पण कोरोनामुळे कामाला उशीर झाला. त्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये हे काम सुरु होणार होतं. त्यानंतरही हे काम दोन महिने लांबणीवर पडले होते मात्र आता काम पूर्ण झालं आहे. या चार मजली 'मल्टीलेव्हल पार्किंग'चा वापर विमानतळ प्रशासन व्यावसायिक तत्त्वावरही करणार आहे. प्रत्येक मजल्यावर पार्किंगसोबतच खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि काही खासगी कार्यालयेही असतील. या पार्किंगमधून विमानतळ प्रशासनाला मोठा महसूल मिळणार असल्याचे बोललं जात आहे.
विमानतळ प्रशासनाकडून उभारण्यात येणाऱ्या पार्किंगचे काम आता पूर्ण होत असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली. या चार मजली हायटेक पार्किंगमध्ये ओला आणि उबरच्या वाहनांसाठीही पार्किंगची सुविधा असेल. येथून प्रवासी थेट टॅक्सी बुक करु शकतात. यासोबतच या पार्किंगमध्ये प्रवासी त्यांची दुचाकी आणि चारचाकी वाहने तासाभराच्या दरानुसार पार्क करु शकतील. दुचाकी आणि कारसाठी दोन तासासाठी 20 रुपये मोजावे लागणार आहे.
ऑनलाईन होणार पार्किंगचं तिकीट बुक
चित्रपटाच्या तिकिटांप्रमाणेच प्रवासी त्यांच्या मोबाईल फोनवरुनही पार्किंग बुक करु शकतात. गुगल पे, फोन पे आणि पेटीएम द्वारे ऑनलाइन पेमेंट देखील प्रवाशांना उपलब्ध असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पार्किंग करण्यासाठी दुसरी जागा शोधण्याची गरज नसणार आहे. त्यामुळे पुणेकरांचा किंवा प्रवास करणाऱ्यांचा वेळ वाचणार आहे. विमानतळाला जोडणाऱ्या फूट-ओव्हर ब्रिजचे कामही पूर्ण झाले आहे. या बहुस्तरीय पार्किंगवरील पुलावरुन प्रवाशांना थेट विमानतळावर जाता येणार आहे.
विमानतळावर दररोज उड्डाणे - 80-85 दररोज
विमानतळावरील प्रवासी - 23,000-25,000
बहुस्तरीय पार्किंग क्षमता – दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी 1,000
पुणे-सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु
पुणे-सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमानसेवेला मान्यता मिळाली आहे. पुणे ते सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरु आहेत. आठवड्यात सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारी ही विमानसेवा सुरु आहे. या विमानसेवेला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पुणेकरांना सिंगापूर गाठणं सोपं झालं आहे.