पिंपरीत MSEB च्या गलथान कारभाराचे दोन बळी, ट्रान्सफॉर्मरमधील उकळतं ऑईल अंगावर पडल्याने आजी-नातीचा मृत्यू
महावितरण विभागाच्या या भोंगळ कारभारामुळेच दोघींचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या गलथान कारभाराने चार महिन्याच्या चिमुकलीसह आजीचा बळी घेतलाय. तर आईची देखील प्रकृती गंभीर आहे. पिंपरी चिंचवडच्या भोसरीत शनिवारच्या दुपारी विद्युत रोहित्रचा स्फोट झाला आणि त्यातील उकळलेलं ऑइल तिघींच्या अंगावर उडाल्याने ही धक्कादायक घटना घडली आहे.
एकदिवस आधी बदलेलं विद्युत रोहित्र नवं जोडलं असतं तर आज ही दुर्दैवी घटना घडली नसती. शिवानी काकडे असं चार महिन्याच्या बाळाचे तर शारदा कोतवाल असं आजीचे नाव होते. तर सत्तर टक्के भाजलेल्या आईचं हर्षदा काकडे असं आहे. त्यांच्यावर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शनिवारी दुपारी घराबाहेर आजी शिवानीला अंघोळ घालत होती. तेव्हा आई हर्षदा जवळच बसली होती. तितक्यात घरालगतच्या विद्युत रोहीत्रचा अचानक स्फोट झाला. बघता-बघता आगीने रौद्ररूप धारण केले आणि विद्युत रोहीत्रमधील उकळलेले ऑईल पंधरा फुटावर असलेल्या तिघींच्या अंगावर उडाले. तिघी ही गंभीर स्वरूपात भाजल्या. तातडीनं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान शिवानी आणि तिच्या आजीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सत्तर टक्के भाजलेल्या आई हर्षदाची मृत्यूशी झुंज सुरु आहे.
ही घटना घडली त्याच्या आदल्या दिवशी ही विद्युत रोहित्र पेटले होते, अशी माहिती अग्निशमन विभागाने दिली. त्यानंतर विद्युत मंडळाने नवे रोहित्र टाकणं अपेक्षित होतं. मात्र जुनेच विद्युत रोहित्र टाकण्यात आलं, शिवाय त्यात काही तांत्रिक बिघाड आहे का? याची खातरजमा केली नसल्याचं दिसून येतंय. महावितरण विभागाच्या या भोंगळ कारभारामुळेच दोघींचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी प्रतिसादच दिला नाही. त्यामुळे त्यांची बाजू अद्याप समजू शकलेली नाही तर दुसरीकडे तपासानंतर भोसरी एमआयडीसी पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत.