एक्स्प्लोर
गुन्हेगाराला पोलिसाची साथ, 'त्या' व्हिडिओनं पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर

पुणे: फसवणुकीच्या आरोपातील गुन्हेगाराला मोकाट सोडणं सहकारनगर पोलिसांच्या अंगलट आलं आहे. कारण आरोपीनं दीड वर्षापूर्वीचा पोलीस अधिकाऱ्याला लाच देतानाचा व्हिडिओ लीक केला आहे. ज्यामुळं पुणे पोलिसांची तर बेअब्रू झालीच, पण वेळेत कारवाई न झाल्यानं मोहम्मद सुलताननं 60 ते 65 तरुणांना गंडा घातला. एपीआय सूरज पाटील यांचा दीड वर्षापूर्वीच्या या व्हिडिओनं पुणे पोलिसात खळबळ उडाली आहे. कारण एका पोलिस अधिकाऱ्याला मोहम्मद सुलतान कुरावलेनं लाच देण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण मोठं गंमतशीर आहे. लाच देणारा मोहम्मद सुलतान कुरावलेनं ग्लोबल स्टार नावानं कंपनी सुरु केली. ज्यात 5 पार्टनर होते. पण मोहम्मदनं त्यातल्या डिमळे नावाच्या पार्टनरला लाखोंचा गंडा घातला. दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर डिमळेनं सहकारनगर पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र तिथं पोलिसांना मॅनेज करुन मोहम्मद सुलताननं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्यावेळी सहकारनगर पोलिसात सूरज पाटील कार्यरत होते. पण मोहम्मदच्या फसवणुकीचं प्रकरण काही पुढं सरकलं नाही आणि सूरज पाटील यांचीही सात महिन्यांपूर्वी वाहतूक विभागात बदली झाली. पण पोलीस कारवाई होत नाही, असं लक्षात आल्यानंतर मोहम्मद सुलताननं मोठी शिकार केली. परदेशात नोकरी लावतो असं सांगून राज्यभरातील 60 ते 65 तरुणांकडून प्रत्येकी 2 ते 4 लाख रुपये वसूल केले. बरं ही सगळी मुलं शिकली सवरलेली. कुणी हॉटेल मॅनेजमेंट केलेलं तर कुणी एमबीए. मात्र यातल्या कुणालाही मोहम्मद सुलतानवर शंका आली नाही. जेव्हा ही मुलं सिंगापूरला नोकरीसाठी पोहोचली, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि घरी परतण्यासाठीही पदरमोड करावी लागली. यानंतर एप्रिल महिन्यात मुलांनी सहकारनगर पोलिसात धाव घेतली. पण मोहम्मद सुलतानच्या जवळीकीमुळं पोलिसांनी मुलांना हुसकून लावलं. अखेर काही जणांनी एकत्र येऊन पुन्हा 7 ऑक्टोबरला मोहम्मद सुलतानविरोधात तक्रार दिली आणि 10 दिवसानंतर म्हणजे 18 ऑक्टोबरला सुलतानवर गुन्हा दाखल झाला. आता कारवाई करायची म्हणून पोलिसांनी मोहम्मद सुलतानच्या 5 साथीदारांना अटक केली. पण खरं रॅकेट चालवणारा मोहम्मद, त्याची बायको आस्मा आणि भाऊ नावेद मात्र मोकाट आहेत. गुन्हेगारांशी जवळीक असल्यानं एक पोलीस अधिकारी लाचखोरीच्या आरोपात अडकला आहे. तर 60 ते 65 तरुण देशोधडीला लागले आहेत आणि फसवणारा मोहम्मद सुलतान मात्र सुशेगाद आहे. आरोपीवर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचा हा परिणाम. VIDEO:
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
क्राईम
क्रिकेट




















