एक्स्प्लोर
म्हाडातर्फे पुणे विभागातील तीन हजार 139 सदनिकांची सोडत
म्हाडातर्फे पुणे विभागातील विविध वसाहतीतील तीन हजार 139 सदनिका आणि 29 भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत निघणार आहे
पुणे : म्हाडातर्फे पुणे विभागातील तीन हजार 139 सदनिका आणि 29 भूखंडांसाठी 30 जूनला सोडत निघणार आहे. आजपासून अर्जदारांच्या नोंदणीला सुरुवात झाली असून 20 मे (उद्या) पासून नोंदणीकृत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.
पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) पुणे विभागातील विविध वसाहतीतील तीन हजार 139 सदनिका आणि 29 भूखंडांच्या विक्रीसाठी https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्जदारांच्या नोंदणीला आजपासून सुरुवात झाली.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 20 मे 2018 म्हणजेच उद्या दुपारी दोन वाजल्यापासून सुरुवात होत आहे, 18 जून 2018 रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत नोंदणी करता येणार आहे.
आय. टी. इनक्युबेशन सेंटर, नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे येथे 30 जून 2018 रोजी सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी पुणे मंडळातर्फे यंदा प्रथमच अर्जदारांना NEFT/RTGS द्वारे अनामत रक्कम भरण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
NEFT/RTGS द्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी 20 मे 2018 दुपारी दोन वाजल्यापासून 19 जून 2018 रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत कालावधी आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंगद्वारे अनामत रक्कम स्वीकारली जाणार आहे.
यंदाच्या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठीच्या सदनिकांचा समावेश आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी एक एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 या कालावधीमध्ये असलेले अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न (पती + पत्नी यांचे एकत्रित उत्पन्न) रु. 25 हजार रुपयांपर्यंत असावे.
अल्प उत्पन्न गटासाठी रु. 25,001 ते रु. 50 हजार रुपयांपर्यंत आणि मध्यम उत्पन्न गटासाठी रु. 50,001 ते रु. 75 हजारापर्यंत तर उच्च उत्पन्न गटासाठी अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न रु. 75,001 किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्जासोबत भरायची अनामत रक्कम (परतावा) + अर्ज शुल्क (विना परतावा) अत्यल्प उत्पन्न गटासाठी रु. 5 हजार 448 प्रति अर्ज, अल्प उत्पन्न गटासाठी रु. 10 हजार 448 प्रति अर्ज, मध्यम उत्पन्न गटासाठी रु. 15 हजार 448 प्रति अर्ज, उच्च उत्पन्न गटाकरिता रु. 20 हजार 448 प्रति अर्ज आकारली जाणार आहे. यामध्ये ऑनलाईन अर्जापोटी प्रतिअर्ज रु. 448 (विना परतावा) अर्ज शुल्काचा समावेश आहे.
यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी सेक्टर 5 ए-ब, नांदेड सिटी (सिंहगड रोड, नांदेड गाव, पुणे) व महाळुंगे टप्पा-1 (चाकण-तळेगाव रोड, चाकण एमआयडीसीसमोर, ता. खेड, जि. पुणे) येथील एकूण 449 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.
अल्प उत्पन्न गटासाठी महाळुंगे टप्पा-2 (चाकण-तळेगाव रोड, चाकण एमआयडीसीसमोर, ता. खेड, जि. पुणे) गोपाळपूर (ता. पंढरपूर, जि. सोलापूर), मोरेवाडी (कोल्हापूर), बार्शी (जि. सोलापूर), विजापूर रोड (जि. सोलापूर), तळेगांव दाभाडे (पुणे), सदर बाजार (सातारा), सासवड(ता. पुरंदर, जि. पुणे), दिवे (ता. पुरंदर, जि. पुणे), हडपसर (पुणे), रावेत (पुणे), नांदेड सिटी (सिंहगड रोड, नांदेड गाव, पुणे), चिखली -मोशी (पुणे), पिंपरी (पुणे), चिखली, चऱ्होली बु., कात्रज, धानोरी, आळंदी रोड, वाकड, येवलेवाडी (ता. हवेली, जि. पुणे),मौजे वडमुखवाडी, शिवाजी नगर (सोलापूर), डुडुळगाव येथील दोन हजार 404 सदनिकांचा समावेश आहे.
मध्यम उत्पन्न गटासाठी सुभाष नगर (कोल्हापूर), सासवड, खराडी, शिवाजीनगर (जि. सोलापूर), विजापूर रोड (जि. सोलापूर), पिंपरी, महाळुंगे टप्पा-1 (चाकण-तळेगाव रोड, चाकण एमआयडीसीसमोर, ता. खेड, जि. पुणे) येथील एकूण 282 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.
उच्च उत्पन्न गटासाठी पिंपरी (पुणे) येथील एकूण चार सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.
अल्प उत्पन्न गटासाठी क्षेत्र माहुली (जि. सातारा) बार्शी (जि. सोलापूर), भोर (जि. पुणे), दहिवडी (ता. माण, जि. सातारा), बनवडी (ता. कराड, जि. सातारा), शिरवळ (ता. खंडाळा, जि. सातारा), अक्कलकोट (जि. सोलापूर), वाठार निंबाळकर (ता. फलटण, जि. सातारा) येथील भूखंडांचा सोडतीत समावेश आहे.
मध्यम उत्पन्न गटासाठी बार्शी (जि. सोलापूर), क्षेत्र माहुली (जि. सातारा), दहिवडी (ता. माण, जि. सातारा) तर उच्च उत्पन्न गटासाठी वाठार निंबाळकर (ता. फलटण, जि. सातारा) येथील भूखंडांचा सोडतीत समावेश आहे.
सदनिकांच्या वितरणासाठी कोणालाही म्हाडाने प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजन्ट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करु नये. तसे केल्यास पुणे मंडळ / म्हाडा कोणत्याही व्यवहारास / फसवणुकीस जबाबदार राहणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
राजकारण
राजकारण
Advertisement