Pune Mhada : सर्वकाही करुनही घराचं स्वप्न अधुरं! खासगी बिल्डरांकडून होणाऱ्या नागरिकांच्या फसवणूकीकडे म्हाडाकडून डोळे झाक; धक्कादायक आकडेवारी समोर
MHADA Lottery : म्हाडाच्या लॉटरीत जेवढ्या घरांचा दावा केला जातो त्यापैकी किती घरं प्रत्यक्षात ग्राहकांना मिळतात याचा शोध घेतला असता अतिशय भयानक परिस्थिती समोर आली.
Pune Mhada Lottery : सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याचा दावा करत पुणे म्हाडाकडून (Pune Mhada) दर काही महिन्यांनी हजारो फ्लॅटची सोडत काढली जाते. मात्र म्हाडाच्या लॉटरीत जेवढ्या घरांचा दावा केला जातो त्यापैकी किती घरं प्रत्यक्षात ग्राहकांना मिळतात याचा शोध घेतला असता ही भयानक परिस्थिती समोर आली आहे. केवळ खाजगी बिल्डरांची घरं (mhada lottery )म्हाडाच्या सोडतीच्या माध्यमातून ग्राहकांच्या माथी मारणं आणि त्या बिल्डरांनी घर वेळेत न दिल्यास जबाबदारी झटकण्याचा प्रकार पुणे म्हाडाकडून सुरू आहे.
नागरिकांना खोटी आश्वासनं
दीक्षा आणि दिलीप बोरगे या दाम्पत्याने पुण्यात घर असण्याचं स्वप्न पाहिलं. आपलं हे स्वप्न म्हाडा पूर्ण करेल या विश्वासानं त्यांनी डिसेंबर 2020 ला झालेल्या म्हाडाच्या सोडतीत सहभाग घेतला. पुण्यातील धायरी भागात एक खाजगी बिल्डर उभारत असलेल्या इमारतीत अकराव्या मजल्यावर त्यांना फ्लॅट मिळाल्याचं पत्र त्यांना म्हाडाकडून देण्यात आलं. पुढचे सोपस्कार पूर्ण होऊन लागलीच बँकेचा हप्ताही सुरु झाला. डिसेंबर 2022 मध्ये तुम्ही तुमच्या हक्काच्या घरात पाऊल ठेवाल असं त्यांना सांगण्यात आलं. मात्र दिलेली मुदत संपून तीन महिने उलटल्यावर इथं फक्त अर्धवट अवस्थेत असलेली इमारत त्यांना दिसत आहे. त्यांना अकराव्या मजल्यावर फ्लॅट मिळणार होता. मात्र या इमारतीला फक्त आठ मजल्यांचीच परवानगी असल्याचं कारण देत बिल्डरने हात वर केले आहेत. म्हाडाच्या सोडतीमध्ये फ्लॅट खरेदी करणाऱ्या पुण्यातील हजारो ग्राहकांची वाईट अवस्था झालीय. एकीकडे ज्या भाड्याच्या घरात ते राहतायत तिथलं भाडं त्यांना द्यावं लागतंय तर जे घर फक्त हवेतच आहे. त्या घराचा हफ्ता त्यांना भरावा लागतोय. अनेक कुटुंब त्यामुळं आर्थिक तणावात जगतायत. पुणे म्हाडाकडून दर काही महिन्यांनी हजारो घरांची सोडत काढली जात असली तरी प्रत्यक्षात किती ग्राहकांना घरं मिळालीत याची आकडेवारी धक्कादायक आहे.
कोणत्या वर्षी किती नागरिकांनी मिळाली घरं?
- जून 2019 मध्ये 4756 घरांची सोडत काढण्यात आली. त्यापैकी फक्त 1169 फ्लॅटच वाटप आतापर्यंत ग्राहकांना करण्यात आले आहेत.
- सप्टेंबर महिन्यात 2019 मधे 2488 घरांची सोडत काढण्यात आली. त्यापैकी फक्त 1533 फ्लॅट वाटप ग्राहकांना करण्यात आले आहेत.
- जानेवारी 2021 मध्ये 5647 घरांची सोडत काढण्यात आली. त्यापैकी फक्त 2060 फ्लॅट वाटप ग्राहकांना करण्यात आले आहेत.
- जुलै 2021 मध्ये 2908 घरांची सोडत काढण्यात आली. त्यापैकी फक्त 755 फ्लॅट वाटप ग्राहकांना करण्यात आलं आहेत.
- जानेवारी 2022 मध्ये 4222 घरांची सोडत काढण्यात आली. त्यापैकी 2423 फ्लॅट वाटप ग्राहकांना करण्यात आले आहेत.
- एप्रिल 2022 मध्ये 2703 घराची सोडत काढण्यात आली. त्यापैकी फक्त 160 ग्राहकांना फ्लॅटच वाटप करण्यात आलंय.
- जानेवारी 2023 मध्ये 6065 घरांची सोडत काढण्यात आली. मात्र यामधील एकही फ्लॅट अद्याप ग्राहकांना देण्यात आलेला नाही.
ग्राहक वाऱ्यावर?
बिल्डर दाद देत नसल्यानं हे लोक जेव्हा म्हाडाच्या कार्यालयात तक्रार करण्यासाठी पोहचतात तेव्हा घर देणं ही म्हाडाची जबाबदारी नसून बिल्डर आणि तुम्ही बघून घ्या असं उत्तर त्यांना दिल जातं. म्हाडाची जबाबदारी फक्त घरांची सोडत काढणं आहे. बिल्डर घर वेळेत देतोय की नाही हे बघणं आमचं काम नाही, असं म्हाडाचे अधिकारी सांगतात. ज्या ग्राहकांना फ्लॅट मिळालेत त्या ग्राहकांना ते राहत असलेल्या घरांमध्ये पाण्याची सुविधाही मिळत नसल्याची लोकांची तक्रार आहे. मात्र इथंही म्हाडाकडून हात वर केले जात आहेत.
म्हाडाची सोडत रद्द
म्हाडाच्या या भोंगळ कारभारामुळे यावर्षी 17 फेब्रुवारीला होणारी सहा हजार घरांची सोडत अचानक रद्द करण्यात आली त्यानंतर ही सोडत 7 मार्चला होईल असं सांगण्यात आलं. मात्र आता पुन्हा ही सोडत अनिश्चित काळासाठी पुढं ढकलण्यात आलीय. या अशा कारभारामुळं स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडावर असलेल्या सामान्यांचा विश्वास वेगाने उडत आहे.