Shrirang Barne Vs Sanjog Waghere : दिल्लीचं पथक मावळात आलं, अजित पवार गटावर अविश्वास दाखवला जातोय? राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष म्हणतात....
आम्ही फक्त आणि फक्त बारणेंचा प्रचार करतोय. वरिष्ठांकडून प्रचाराची माहिती घेतली जातेचं, पथकाला दिल्ली नाव जोडलं नसतं तर कदाचित हा संभ्रम झाला नसता, अशी प्रतिक्रिया अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दिली आहे.
मावळ, पुणे : मावळ लोकसभेतील महायुतीत मोठी खदखद आहे. अजित पवारांची (Ajit Pawar) राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंचा (Shrirang barne) प्रचार करते का? अशी शंका नेहमीचं उपस्थित केली जाते. अशातच दिल्लीवरून सहा जणांचं पथक मावळ लोकसभेत धडकलं आहे. यानिमित्ताने अजित पवार राष्ट्रवादी गटावर अविश्वास तर दाखवला जात नाही ना? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. मात्र महायुतीत आमच्यावर कोणी अविश्वास दाखवत नाही. आम्ही फक्त आणि फक्त बारणेंचा प्रचार करतोय. वरिष्ठांकडून प्रचाराची माहिती घेतली जातेचं, पथकाला दिल्ली नाव जोडलं नसतं तर कदाचित हा संभ्रम झाला नसता, अशी प्रतिक्रिया अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दिली आहे.
दिल्लीतील पथक मावळात दाखल झाल्यानंतर य पथकाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. त्यातच या पथकामुळे टीकादेखील होताना दिसत आहे. महायुतीचा बारणेंवर विश्वास नाही का?, हे पथक नेमकं कोणाची चौकशी करत आहे?, पथक नेमकं कोणासाठी आलं आहे?, याची चर्चा सर्वत्र रंगताना दिसत आहे.
त्यांचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले की, सगळे आमचे मित्र पक्ष आहेत हे खूप चांगलं काम करतात. जसं मावळातून अनेक कार्यकर्ते बारणेंसाठी प्रचार करत आहेत. सगळे मित्र पक्षाचे कार्यकर्तेदेखील जोमात कामाला लागले आहेत.त्यात निवडणुकीची अनेक धोरणं आखून दिली आहेत. त्याप्रमाणे सगळी कामं करत आहोत. हे पाहण्यासाठी जर असं कोणतं पथक आलं असेल ही चांगली बाब आहे. प्रचार चांगला सुरु आहे. वरिष्ठदेखील सगळी माहिती घेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
महायुतीचे कार्यकर्ते संजोग वाघेरेंना भेटतात?
महायुतीचे काही कार्यकर्ते कायम संजोग वाघेरेंना भेटत आहेत, असं सांगण्यात येत आहे असं विचारल्यास कोणतेही कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात नाही. अजित पवारांना तशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. आमच्यापैकी कोणतेही कार्यकर्ते संजोग वाघेरेंचा प्रचार करत नाही आहेत. हा सगळा संजोग वाघेरेंच्या प्रचाराचा भाग आहे. ते असं करुन बेनिफिट मिळवायचा प्रयत्न करत आहेत.
मावळमध्ये बारणे विरुद्ध वाघेरे लढत
मावळमध्ये बारणे विरुद्ध वाघेरे अशी लढत आहे. बारणेंना विजयी करण्यासाठी मोठ्या नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहेत. तर वाघेरेंना विजयी करण्यासाठीदेखील वरिष्ठांच्या सभा आणि रोड शो आयोजित केले जात आहे. मावळमध्ये शिवसेना विरुद्ध उबाठा अशी लढत असल्यामुळे अनेकांचं या मतदारसंघाकडे लक्ष लागलं आहे.
इतर महत्वाची बातमी-