पुण्यातील सासवडमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या महिलेच्या मुलाचीही हत्या, पती अद्यापही बेपत्ता
पुण्यातील सासवडमध्ये मृतदेह आढळून आलेल्या महिलेच्या मुलाचीही हत्या झाल्याचं समोर आलं आहे. नवीन कात्रज बोगद्याजवळ मुलाचा मृतदेह आढळला. दरम्यान महिलेचा पती अद्यापही बेपत्ता आहे.

पुणे : पुण्याजवळील सासवडमध्ये काल (15 जून) सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. आता त्या महिलेच्या आठ वर्षाच्या मुलाचाही खून झाल्याचं उघड झालं आहे. महिलेचे नाव आलिया शेख असून तिच्या मुलाचं नाव अयान शेख आहे. परंतु आलिया यांचे पती आबीद शेख मात्र गायब आहेत.
हे कुटुंब पुण्यातील धानोरी भागात राहणारे असून चार दिवसांपूर्वी आबीद शेख यांनी पिकनिकला जाण्यासाठी ब्रीझा कार भाड्याने घेतली होती. हे कुटंब पिकनिकसाठी बाहेर पडलं खरं पण काल सकाळी सासवड गावात आलिया यांचा तीक्ष्ण हत्याराने वार केलेला मृतदेह आढळून आला. सासवड पोलीस त्या खुनाचा तपास करत असतानाच संध्याकाळी नवीन कात्रज बोगद्यालगत एका आठ ते दहा वर्षांच मुलाचाही मृतदेह आढळून आला.
कात्रज पोलीस त्या खुनाचा तपास करत असतानाच काल सकाळी सासवडला ज्यांचा मृतदेह आढळून आला, त्या आलिया यांचा तो अयान नावाचा मुलगा असल्याचं उघड झालं. तर आबीद शेख यांनी भाड्याने घेतलेली ब्रीझा कार पुणे-सातारा रस्त्यावर एका चित्रपटागृहासमोर सोडून दिल्याचं आढळून आली आहे. आबीद शेख हे एका एका कंपनीत ब्रान्च मॅनेजर म्हणून काम करतात.
पिकनिकसाठी घराबाहेर पडल्यानंतर नेमकं काय झालं? आई-मुलाची हत्या का झाली तसंच आबीद शेख कुठे आहेत याचा तपास पोलीस करत आहेत. आबीद शेख यांचा ठावठिकाणा लागल्यावरच या प्रकरणावरुन पडदा उठेल. मात्र तूर्तास या दुहेरी हत्येचं गूढ उकलण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
