(Source: Poll of Polls)
अजित पवारांनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा?, राजकीय वातावरण तापणार
Shirur Lok Sabha Constituency : आगामी काळात शिरूर लोकसभेवरून शिंदे गट विरुद्ध अजित पवार गटात संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
पुणे (शिरूर) : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) शिरूर लोकसभा मतदारसंघावर (Shirur Lok Sabha Constituency) परस्पर दावा ठोकल्यानंतर आता लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) त्यांना प्रतिउत्तर देण्यासाठी शिरूर लोकसभेत येतायेत. मुख्यमंत्र्यांच्या शिवसंकल्प अभियानाची 6 जानेवारीला शिरूर लोकसभेतून सुरुवात होतेय. याद्वारे ते शक्तिप्रदर्शन करून शिरूर लोकसभेवर दावा ठोकणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात शिरूर लोकसभेवरून शिंदे गट विरुद्ध अजित पवार गटात संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर, मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्याबद्दल शिवाजी आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी माहिती दिली आहे.
महायुतीमध्ये शिरूर लोकसभेची जागा कोणी लढवावी यावरून दावे-प्रतिदावे सुरू आहे. शिरूर लोकसभेची जागा आम्ही लढू आणि जिंकून देखील आणू असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. विशेष म्हणजे महायुतीत असलेल्या अजित पवारांनी हा दावा परस्पर केला आहे. अजित पवारांच्या याच दाव्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील शिऊर लोकसभा मतदारसंघात मेळावा घेत आहे. तर, शिंदे गटाकडून शिवाजीराव अढळराव पाटील हे उमेदवार असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.
लोकसभेची निवडणूक लढणारच...
याबाबत बोलतांना शिवाजी आढळराव पाटील म्हणाले की, "शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याचा निर्धार करणारे अजित पवारचं शिरूर लोकसभेचा त्यांचा उमेदवार कोण असेल हे तेच ठरवतील. मात्र, मी शिंदे गटातच राहणार. अजित पवार गटाचे तिकीट घेऊन शिरूरची निवडणूक लढणार, या चर्चांना अद्याप अजित दादांनी ही दुजोरा दिलेला नाही. मात्र, मी शिरूर लोकसभेची निवडणूक लढणार हे निश्चित असल्याचे शिवाजी आढळराव पाटील म्हणाले.
शिवसेनेने लढवलेल्या 22 जागांवर मुख्यमंत्र्यांचा दौरा
पुढे बोलतांना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, अजित पवारांच्या घोषणेनंतर आम्ही त्यांना प्रतिउत्तर देत असल्याच्या जो काही संभ्रम निर्माण झाला आहे, तशी प्रत्यक्षात वस्तुस्थिती नाही. यापूर्वी शिवसेनेने लढवलेल्या 22 जागांवर दौरा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या दौऱ्यात लोकांची भेट घेऊन कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यात येणार आहे. त्या माध्यमातून मिशन 48 कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. महायुतीला कमीत कमी 45 जागांवर निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला आहे. आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे लोकसभा मतदारसंघात मेळावा घेत असल्याचे शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले.
आमचाही शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा
अजित पवारांनी जरी शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा केला असला, तरी त्यांच्या दाव्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. कारण हा त्यांचा जिल्हा आहे आणि या मतदारसंघावर त्यांचं वर्चस्व आहे. दुसऱ्या बाजूला मी देखील चार निवडणुका याच मतदारसंघातून लढवल्या आहे. तसेच मोठ्या मताने विजय देखील मिळवला होता. त्यामुळे आमचा देखील त्या मतदारसंघावर तेवढाच दावा आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या जागेवर दावा करण्यासाठी मेळावा घेत आहे असं काही नाही. तर, अमोल कोल्हे यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीचा कोण उमेदवार असणार हे आता अजित दादाच ठरवतील, असे शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: