(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lalit Patil Durgs Case : ललित पाटील उपचार प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल समोर; ससूनचे डीन ठाकूरसह डॉक्टरावर ठपका, कारवाईची शिफारस
Lalit Patil Drug Case : ललित पाटील प्रकरणात ससुनचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर आणि आर्थोपेडीक सर्जन डॉक्टर प्रविण देवकाते चौकशी समितीला दोषी आढळले आहेत.
पुणे : ड्रग्ज माफीया ललित पाटील (Lalit Patil) याच्यावर ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) सुरू असलेल्या उपचार प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल समोर आला आहे. या चौकशी समितीने ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर (Dr. Sanjeev Thakur) आणि आर्थोपेडीक सर्जन डॉ. प्रविण देवकाते यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. या दोघांवरही कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढील कारवाई पुणे पोलीस करणार का, याकडे लक्ष लागले आहे.
चौकशी समितीकडून कारवाईची शिफारस
ललित पाटील प्रकरणात ससुनचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर आणि आर्थोपेडीक सर्जन डॉक्टर प्रविण देवकाते चौकशी समितीला दोषी आढळले आहेत. डॉक्टर संजीव ठाकूर यांची विभागीय चौकशी करण्याचे आणि त्यांना पदमुक्त करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. तर डॉक्टर प्रवीण देवकाते यांच निलंबन करण्यात आले आहे. डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या सांगण्यावरून डॉक्टर प्रवीण देवकाते यांच्या निगराणीखाली ललित पाटीलवर उपचार होत होते. ललित पाटील फरार झाल्यानंतर दहा दिवसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीला डॉक्टर संजीव ठाकूर आणि डॉक्टर प्रवीण देवकाते दोषी आढळलेत.
ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांची उचलबांगडी
ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांची अधिष्ठातापदावरून उचलबंगडी करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर त्यांना अधिष्ठातापदावरून हटवण्यात आलं आहे. ललित पाटील प्रकरणामुळे संजीव ठाकूर चर्चेत होते. त्यांच्या जागी आता पुर्वीचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांची अधिष्ठातापदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून संजीव ठाकूर हे नाव चांगलंच चर्चेत होते.
पूर्वीचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांची मध्यावधी बदली झाली होती. त्या विरोधात त्यांनी मॅटमध्ये दावा दाखल केला. मॅटने डॉ. काळे यांच्या बाजूने निकाल दिला. मात्र, त्या विरोधात डॉ. ठाकूर यांनी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. त्याचा निकाल आज न्यायालयाने दिला. त्यात पून्हा अधिष्ठातापदी डॉ. काळे यांना नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.