Koregaon Bhima: कोरेगाव भीमा ऐतिहासिक स्तंभ परिसरात सभा घेण्यास बंदी; कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून निर्णय
पुण्यातील कोरेगाव भीमा गावात विजयस्तंभ शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी हजारो नागरिक एकत्र येत असतात. त्या पार्श्वभूमी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठी खबरदारी घेतली जाते.
Koregaon Bhima: कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथील ऐतिहासिक स्तंभ परिसरात 1 जानेवारीला सभा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरता जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तसंच 31 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत या परिसरात मद्यविक्रीसही बंदी घालण्यात आली आहे.
दरवर्षी 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी राज्याच्या विविध भागातून नागरिक येत असतात. गेल्या वर्षी करोनामुळे राज्य सरकारकडून निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे यंदा या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यातील कोरेगाव भीमा गावात विजयस्तंभ शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी हजारो नागरिक एकत्र येत असतात. मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होते. त्या पार्श्वभूमी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठी खबरदारी घेतली जाते. त्यामुळे दारु विक्रीवर बंदी घातल्यात आली असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
भीमा कोरेगाव आणि परिसरातली गावात मद्य विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील शिक्रापूरसोबतच लोणीकंद पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये असणारे देशी, विदेशी दारू, वाईन, बिअर, ताडी यासह मद्यविक्रीची दुकाने राहणार बंद राहणार आहेत. या बंदीच्या नियमाचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहेत. देशभरातील अनुयायी 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी येतात. त्यांना सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. त्यासाठी प्रत्येक विभागाने समन्वयक अधिकारी नेमावा. येणाऱ्या अनुयायांना कोणतीही समस्या येणार नाही, याची दक्षता घ्यावी आणि नियोजित वेळेत आवश्यक काम पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.जिल्हाधिकाऱ्यांनी वाहनतळ आणि इतर व्यवस्थेसंबंधी ठिकाणांना भेट देऊन तेथील तयारीचा आढावा घेतला होता. यावेळी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारीदेखील होते.