Jejuri News : जेजुरीत देवस्थानच्या विश्वस्तपदाचा वाद चिघळला; ग्रामस्थ 4 जूनला घेणार राज ठाकरेंची भेट
जेजुरी गडावर भंडारा उधळून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांची दिला. येत्या 4 तारखेला जेजुरीकर ग्रामस्थ मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचंही आंदोलकांनी सांगितलं आहे.
Jejuri News : महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या (Jejuri News) खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त पदाचा वाद थांबायचं नाव घेत नाही आहे. दिवसेंदिवस आंदोलन तीव्र होताना दिसत आहे. आज आंदोलन स्थळापासून ते खंडोबा गडावरील अहिल्यादेवी होळकर पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढून, अहिल्यादेवींच्या पुतळ्यावर पुष्पवृष्ठी करून आणि भंडारा उधळून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांची दिला. येत्या 4 तारखेला जेजुरीकर ग्रामस्थ मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचंही आंदोलकांनी सांगितलं आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याजवळ भंडारा उधळून आणि पुष्पवृष्टी करून लढा तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. आज सलग 6 व्या दिवशी जेजुरीकरांचे धरणे आंदोलन सुरू असून आंदोलन स्थळापासून ते खंडोबा गडावरील अहिल्यादेवी होळकर पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढली होती. मागील सहा दिवसांपासून हे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे आता जर तोडगा निघाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा
मंगळवारी (30 मे) पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यलयावर जेजुरीच्या ग्रामस्थांनी आंदोलन केलं होतं. त्यावेळी त्यांनी प्रशासनावर टीका केली. यात उघडा मारोती मंडळाचे प्रमुख सचिन सोनावणे यांच्या मार्गदर्शनासाठी कार्यकर्त्यांनी काळ्य़ा फिती लावून घंटानाद आंदोलन केलं. जोपर्यंत स्थानिक विश्वस्त नियुक्त होत नाहीत तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. या आंदोलनात सुमारे 50 वाहनातून 200 कार्यकर्ते पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आले होते. जेजुरीतील ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन जागरण गोंधळ, रास्ता रोको केला होता. तसेच रात्री विश्वस्त पदाचा पदभार स्वीकारण्यासाठी आलेल्या विश्वस्तांविरोधात घोषणाबाजी केली. गावकऱ्यासमोर विश्वस्त मंडळाला काढता पाय घ्यावा लागला. तर जेजुरीत कधी याआधी अशा पद्धतीने चार्ज स्वीकारला गेला नसल्याचे माजी विश्वस्त मंडळाचे म्हणणं आहे.
मंदिराच्या बाबतीत देखील भाजप राजकारण करत आहे: आमदार शशिकांत शिंदे
मंदिराच्या बाबतीत देखील भाजप राजकारण करत आहेत. स्थानिकाची निवड जेजुरीच्या विश्वस्त मंडळावरती होणे गरजेचे आहे. सरकारने त्याला न्याय द्यावा नाहीतर हा मुद्दा आम्ही आगामी अधिवेशनात हा उचलून धरू, असं आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, मागील काही दिवसांपासून जेजुरीच्या विश्वस्तांचा वाद सुरु आहे. राज्यातलं सरकार म्हणजेच शिंदे-फडणवीस सरकार फक्त धर्मावर राजकारण करत आहेत. जेजुरीच्या स्थानिकांची आणि भक्तांची भावना जाणून न घेता. आपल्या पदाधिकाऱ्यांची सोय करण्यासाठी प्रयत्न करणं हे आपल्या राज्याचं दुर्दैव आहे. त्यामुळे जेजुरीचा खंडोबादेखील या सरकारच्या तावडीतून सुटला नसल्याचा आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला आहे.