माऊलींच्या इंद्रायणीचं पावित्र्य धोक्यात, उदय सामंत म्हणले, नदीबाबत सकारात्मक पावलं उचलणार
आमदार महेश लांडगे यांनी या संदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. आमदार महेश लांडगे यांच्या लक्षवेधीस उत्तर देताना मंत्री सामंत यांनी ही ग्वाही दिली आहे.
नागपूर: पुण्यातील देवाच्या आळंदीतील (Alandi) इंद्रायणी नदी प्रदुषणाबाबत (Indrayani Pollution) विधानसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर सरकारने इंद्रायणी नदीबाबत सकारात्मक पावले उचलणार असल्याची ग्वाही दिली आहे. इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करणार,अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात आदेश दिल्याची माहिती सामंत यांनी दिली आहे. आमदार महेश लांडगे यांनी या संदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. आमदार महेश लांडगे यांच्या लक्षवेधीस उत्तर देताना मंत्री सामंत यांनी ही ग्वाही दिली आहे.
इंद्रायणी नदीच्या काठावरती बेकायदेशीर कत्तलखाने आहेत. रात्री जनावरांची कत्तल केली जाते ते सर्व नदी पात्रात सोडलं जातं. वारकरी त्याच इंद्रायणी नदीच पाणी तिर्थ म्हणून घेतात हे थांबणार आहे का? असा सवाल दिलीप मोहिते पाटील यांनी केला. यावर उत्तर देताना उदय सामंत म्हणाले, इंद्रायणी नदी प्रदूषणाबात तीन ते चार वर्षे चालेल असे काम सुरु आहे. डीपीआर तीन महिन्यात ठरवून निविदा काढली जाईल. अनधिकृत गोदामामधील घाण पाण्याची तपासणी केली जाईल तसे आदेश पर्यावरण विभागास दिले जणार आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी
आषाढी वारी, कार्तिकी एकादशी अशा प्रसंगी लाखो वारकरी आळंदीनगरीत दाखल होतो. तेव्हा याच इंद्रायणी नदीत ते पवित्र स्नान करतात अन् तीर्थ म्हणून हेच रसायनयुक्त पाणी पितात. पण आता वारकरी अन स्थानिकांना या पाण्यामुळं आजार जडत आहेत. गेल्या सात वर्षांपासून अनेकदा अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तशा तक्रारी ही करण्यात आल्या आहेत.
इंद्रायणी नदीबाबतची ही उदासीनता कधी दूर होणार?
महाराष्ट्र प्रदूषण मंडळ या इतक्या गंभीर विषयाची जबाबदारी घ्यायला कधीच तयार नसतं. तर दुसरीकडे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अन् उद्योग मंत्री यांना ही केवळ आषाढी वारी, कार्तिकी एकादशी अन संजीवन समाधी सोहळ्यावेळीच याची आठवण होते. लाखो वारकाऱ्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या या इंद्रायणी नदीबाबतची ही उदासीनता कधी दूर होणार? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ
एकीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने डोळ्यावर पट्टी बांधली आहे, तर दुसरीकडे राज्य सरकार केवळ आश्वासनं देण्यावर धन्यता मानत आहे. इंद्रायणी नदीने मोकळा श्वास घ्यावा एवढी माफक अपेक्षा ठेवणाऱ्या वारकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचं पाप त्यांच्या माथी पडतंय, याचा मात्र त्यांना विसर पडलाय.