Pooja Khedkar Car: पुणे पोलिसांची नोटीस धडकताच वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरांच्या बंगल्यातून ऑडी कार जागेवरून गायब
Pooja Khedkar Audi Car : पुणे पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर आज ऑडी कार बंगल्यातून हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ऑडी कार नेमकी कुठे हलवली याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरांच्या (Pooja Khedkar) बंगल्यातून ऑडी कार (Audi Car) हलवण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) नोटीस बजावल्यानंतर कार हलवल्याची माहिती समोर आली आहे. बाणेर येथील बंगल्यात ऑडी कार झाकून ठेवण्यात आली होती. त्यानंतर काल पुणे पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर आज ऑडी कार बंगल्यातून हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ऑडी कार नेमकी कुठे हलवली याबाबत प्रश्नचिन्ह आहे. याच ऑडी कारवर अंबर दिवा लावून पूजा खेडकर जिल्हाधिकारी कार्यलयात जात होत्या. शिवाय बंगल्यात असणारी दुसरी पजेरो कारही खेडकर यांनी बंगल्यातून हलवली आहे.
ट्रेनी आयएएस असताना स्वतःच्या ऑडी गाडीवर अंबर दिवा लावून चमकोगिरी केल्याप्रकरणी पूजा खेडकर या चर्चेत आल्या होत्या. अशा प्रकारचा दिवा कोणत्याही अधिकाऱ्याच्या गाडीवर लावण्यात येऊ नये अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या असतानाही पूजा खेडकरांनी ती गोष्ट केली. या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर त्यांची ऑडी कार चांगलीच चर्चेत आली. पुणे पोलीस पूजा खेडकरांच्या ऑडी गाडीवर कारवाई करण्यास देखील गेले होते. मात्र त्यांच्या आईने पोलिसांनाच दमदाटी करत गेटबाहेरच उभे केले. त्यानंतर आज ही कार बंगल्यातून गायब आहे.
पूजा खेडकरांच्या ऑडी कारच्या मालकाचे नाव समोर
सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूजा खेडकर वापरत असलेली ती ऑडी गाडी थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची आहे. थर्मोव्हेरिटाचा मूळ
मालक हा मनोरमा खेडकरांचा माजी सहकारी आहे. मनोरमा खेडकर या वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरची आई आहे. आता ही माहिती समोर आल्यानंतर पोलीस काही कारवाई करतात का? त्यांना नोटीस बजावतात का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
काय आहे प्रकरण?
डॉ. पूजा खेडकर या 2023 च्या आयएएस बॅचच्या अधिकारी आहे. अजून त्यांच्या कारकीर्दीला नीट सुरुवातही झाली नाही पण अवघ्या काही महिन्यांतच त्या चर्चेचा विषय बनल्यात. प्रोबेशनवर रुजू होण्याआधीच पूजा खेडकरांच्या डोक्यात पदाची हवा गेली होती. रुजू होण्यापूर्वीच स्वतंत्र केबिन, कार, शिपाई आणि निवासस्थानाची मागणी केली. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात बसण्याची सूचना फेटाळली. अप्प्पर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्याच केबिनचा जबरदस्तीनं ताबा मिळवला. स्वतःच्या खासगी ऑडी कारवर सरकारी वाहनांवरचा लाल दिवा लावत होत्या . प्रोबेशनवर असलेल्या अधिकाऱ्याला हे सगळं मिळणं नियमबाह्य असतानाही त्यांनी वडिलांच्या मदतीनं ते सगळं मिळवण्याचा प्रयत्न केला आणि अखेर त्यांची बदली वाशिममध्ये करण्यात आली.
Video:
हे ही वाचा :
Pooja Khedkar Video : "सगळ्यांना तुरुंगात टाकेन", ऑडी कारवर कारवाई करायला गेलेल्या पुणे पोलिसांना IAS पूजा खेडकरच्या आईची दमदाटी