(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'सामना'च्या अग्रलेखातील भाषेबाबत रश्मी वहिनींना पत्र लिहिणार : चंद्रकांत पाटील
वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यानंतर 'सामना'च्या अग्रलेखातून भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता. 'सामना'च्या अग्रलेखातील भाषेबाबत संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे
पुणे : औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर 'सामना'तून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. आताही संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यावर जी भाषा वापरली त्याबाबत मी 'सामना'च्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. ते पुण्यात बोलत होते.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी भाजप नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला होता. राजकीय भडास काढण्यासाठी भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आहे, असं राऊत म्हणाले होते. शिवाय सामनातूनही भाजप नेत्यांवर टीकेचे बाण सोडण्यात आले होते. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, "सामनातून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. आताही संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यावर जी भाषा वापरली त्याबाबत मी रश्मी वहिनींना पत्र लिहिणार आहे. तुम्ही 'सामना'च्या संपादिका आहात, म्हणजे हा अग्रलेख तुमच्या नावाने लागतो. ही तुमची भाषा असू शकत नाही. मग अग्रलेखात ही भाषा कशी? असा प्रश्न त्यांना विचारणार आहे."
औरंगाबादचं नामांतर हा आमच्यासाठी भावनिक मुद्दा : चंद्रकांत पाटील औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करणं हा आमचा राजकीय मुद्दा नाही, निवडणुकीचा नाही तर भावनिक मुद्दा आहे. काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का? समजा असेल तर औरंगजेबाचं तरी नाव कशाला? ते आधी हटवा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. नामांतराची सर्वप्रथम मागणी बाळासाहेब ठाकरेंनी केली. तुम्ही गोधड्या वाळवत आहात असं आम्हाला म्हणता तर आता करा नामांतर, असं आव्हानही त्यांनी दिलं. सोबतच नामांतराला काँग्रेसचा विरोध आहे, शिवसेनेला नामांतर करायचं आहे, पण या विषयात आम्हाला पडायचं नाही. पण औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर झालं पाहिजे ही आमची 100 टक्के भूमिका आहे," असंही पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटलांचे नवीन वर्षातील संकल्प सरत्या वर्षाचा निरोप देऊन नववर्षाचं उत्साहात स्वागत झालं. नवीन वर्षाचा संकल्प काय असं विचारलं असता चंद्रकांत पाटील यांनी यादीच सांगितली. ते म्हणाले की, नवीन वर्षी जास्तीत जास्त प्रवास करणे जो कोरोना काळात झाला नाही आणि संघटना मजबूत करणे. 2021 साली ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदा निवडणुका ताकदीने लढणे आणि जिंकणे. 2022 साली मुंबई महापालिका निवडणुका लढवणे जिंकणे हे लक्ष्य आहे."
2022 ची बीएमसी, 2024 च्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीची तयारी "मुंबईवर दिल्लीचेही लक्ष राहिल. मुंबई ही काही जणांची जहागिरी राहिली आहे. मात्र पायाभूत सुविधा, मुंबईच्या समस्यांकडे दुर्लक्ष आणि मनीजनरेट करणे एवढंच लक्ष्य राहिलं काहींचं. त्यामुळे मुंबई महापालिका जिंकणे हे तर लक्ष्य आहेच आणि 2022 नंतर 2024 ला किती दिवस राहतात, लोकसभा ,विधानसभेला," असं म्हणत भाजप पुढच्या तीन चार वर्षांची तयारी करत असल्याचं सांगितलं.
संबंधित बातम्या