Manikrao Kokate Resignation: अटक वॉरंट निघण्याची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
Manikrao Kokate Resignation: माणिकराव कोकाटे यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या अडचणीत सापडली आहे. अजित पवार आणि सुनील तटकरेंनी फडणवीसांशी चर्चा केल्याचे समजते.

Manikrao Kokate Resignation: शासकीय सदनिका लाटण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याबद्दल न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्याकडील क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास ही दोन्ही खाती काढून घेण्यात आली आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी बुधवारी रात्री उशीरा याबाबतचा आदेश जारी केला. माणिकराव कोकाटे यांच्याकडील दोन्ही खाती काढून घेण्यात आली असली तरी त्यांचे मंत्रिपद अजूनही कायम आहे. ते सध्या बिनखात्याचे मंत्री आहेत. परंतु, माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचाही राजीनामा दिला पाहिजे, यावर भाजप ठाम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बुधवारी सकाळी झालेल्या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना तशी कल्पना दिली होती. परंतु, अजित पवार हे माणिकराव कोकाटे यांना पुन्हा अभय देण्याच्या विचारात होते. परंतु, माणिकराव कोकाटे यांना बिनखात्याचे मंत्री म्हणून कायम ठेवल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या क्लीन इमेजला तडा जाऊ शकतो. त्यामुळेच भाजप कोकाटे यांच्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी रात्री उशीरा आपल्या पदाचा राजीनामा अजित पवार यांच्याकडे सोपवल्याची माहिती आहे. हा राजीनामा अद्याप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचलेला नाही. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचे पत्र देवेंद्र फडणवीस यांना मिळाल्यानंतर ते राज्यपालांकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर माणिकराव कोकाटे हे मंत्रिपदावरुन अधिकृतरित्या दूर होतील.
Manikrao Kokate news: माणिकराव कोकाटेंना रुग्णालयात का दाखल केलं?
माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात बुधवारी अटक वॉरंट जारी होण्याच्या हालचाली सुरु असताना ते अचानक रुग्णालयात दाखल झाले होते. माणिकराव कोकाटे यांना काल मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. माणिकराव कोकाटे यांना उच्च रक्तदाब व श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना काल दुपारच्या सुमारास रुग्णालयात आणण्यात आले. त्यांना श्वास घेण्यात अडचण येत असल्याने आणि हृदयाशी संबंधित त्रास जाणवत असल्याने डॉक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
आणखी वाचा























