'पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जा' : संजय राऊत
माझ्या कुटुंबाला ईडीची नोटीस आल्यानंतर अचानक गोदी मीडियातले कमळं फुलायला लागली आहेत, समझनेवाले को इशारा काफी है असा टोला खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. मंगळवारी ईडीच्या कार्यालयात हजर न राहू शकलेल्या वर्षा राऊत यांना आता 5 जानेवारीला ईडी समोर हजर व्हावं लागणार आहे. या प्रकरणी आता राज्याचं राजकारण तापू लागल्याचं दिसत आहे. 'पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जाण्यास तयार राहा. समझनेवाले को इशारा काफी है', असं संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या पीएमसी बँकेतील खात्यात 55 लाखांची ट्रान्सफर कशाकरता करण्यात आली आहे याचा तपास करण्यासाठी ईडीने त्यांना नोटीस पाठवल्याचं सांगण्यात येतंय. आता यावरुन संजय राऊत आणि भाजपमध्ये शाब्दिक चकमक पहायला मिळतेय.
ईडीची नोटीस आल्यानंतर संजय राऊत यांनी अनेकवेळा भाजपवर टीका केली आहे. शिवसैनिकांनी ईडीच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर भाजप कार्यालय असे पोस्टर्स लावले आहेत. आता संजय राऊत यांनी एक ट्वीट करुन समझनवालोंको इशारा काफी है असं सांगत भाजप नेत्यांना खुलं आव्हान दिलंय.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, "माझ्या कुटुंबाला ईडीची नोटीस आल्याची बातमी प्रसारित झाल्यानंतर अचानक गोदी मीडियातले लहान कमळं फुलायला लागली आहेत. या राजकीय पोपटांचा वापर राजकीय कामांसाठी कशा पध्दतीनं केला जातोय हे जनतेला माहीत आहे. माझ्या कुटुंबाचं नाव पीएमसी आणि एचडीआयएल घोटाळ्यामध्ये विनाकरण गोवण्यात आलंय. त्यांना मी आव्हान देतोय की पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जाण्यास तयार राहा. समझनेवाले को इशारा काफी है!"
जय महाराष्ट्र!!@BJP4India @KiritSomaiya @AmitShah @AUThackeray @OfficeofUT pic.twitter.com/JHOFXlfB8t
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 30, 2020
वर्षा राऊत यांना 29 डिसेंबरला ईडीसमोर हजर राहाण्यास सांगितलं होतं पण त्या चौकशीसाठी हजर राहू शकल्या नाहीत. वर्षा राऊत यांनी ईडीकडे वेळ मागितला. ईडीनं आता नवं समन्स बजावले असून त्यानुसार वर्षा राऊतांना 5 जानेवारीला मुंबईतील कार्यालयात हजर राहावं लागणार आहे. संजय राऊत या प्रकरणी आता कायदेशीर सल्ला घेत असल्याचं पहायला मिळतंय. राज्याचे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी मंगळवारी संजय राऊत यांची सामनाच्या कार्यालयात भेट घेतली.
संबंधित बातम्या























