(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Car Brakes Fail: ब्रेक फेल झाल्यास गाडी कशी कंट्रोल करावी?
ब्रेक फेल झाल्याने अपघात होण्याचं प्रमाण जास्त आहे. ब्रेक फेल झाला तर नेमकं काय करावं किंवा करु नये. याची माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे अपघाताचं प्रमाण कमी होऊ शकतं.
Car Brakes Fail: पुण्यातील नवले पुलावर एकाच रात्री तीन अपघात झाले. तिन्ही अपघाताची कारणं वेगळी असली तरीदेखील ब्रेक फेल होऊन अपघात होण्याचं प्रमाण जास्त आहे. तुम्ही गाडी चालवत असताना कोणत्याही अनपेक्षित वेळी अपघात होऊ शकतात. गाडी चालवताना ब्रेक अचानक काम करणे बंद झाल्याने चालक साहजिकच घाबरतात. ज्यामुळे ब्रेक फेल झाल्यास वाहनावर सहज नियंत्रण ठेवता येणं कठीण होतं. मात्र ब्रेक फेल झाला तर नेमकं काय करावं किंवा करु नये. याची माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे अपघाताचं प्रमाण कमी होऊ शकतं.
ब्रेक फेल झाल्यावर कार कशी कंट्रोल करावी?
-ब्रेक लागत नसल्याचं लक्षात येताच कारचा वेग कमी करून त्यावर नियंत्रण ठेवा. ब्रेक सतत दाबण्याचा प्रयत्न करा. असं अनेक वेळा केल्याने ब्रेकला योग्य दाब पडतो आणि ते पुन्हा काम करू शकतात.
-जर तुमची कार टॉप गेअरमध्ये चालत असेल तर ती कमी झाल्यावर खालच्या गेअरमध्ये शिफ्ट करा.
-आपण घाबरू नका हे खूप महत्वाचे आहे. पाचव्या वरून लगेच पहिल्या गेयरवर शिफ्ट करू नका.
-तुमची कार अजूनही वेगात असताना गेअर न्यूट्रलमध्ये आणू नका. तुम्ही असे केल्यास कार नियंत्रणाबाहेर जाईल.
-चुकूनही गाडी रिव्हर्स गिअरमध्ये लावू नका, मागून येणाऱ्या वाहनाने अपघात होण्याची शक्यता आहे.
-फक्त क्लच वापरा आणि एक्सीलरेटर अजिबात वापरू नका.
-तुम्ही कुठेतरी ट्रॅफिकमध्ये असाल तर इतरांना हॉर्न, धोका दिवे, इंडिकेटर आणि हेडलॅम्प-डिपरने सिग्नल करा. त्यामुळे कोणत्याही अपघाताचा धोका कमी होईल.
-तज्ज्ञांच्या मते, अशा स्थितीत वाहनाची एअर कंडिशन चालू करा. यामुळे इंजिनवरील दाब वाढेल आणि वेग थोडा कमी होईल.
-हेडलाइट्स, हॅझर्ड लाइट्स लावल्याने बॅटरीचा पॉवर सप्लाय कमी होऊन कारचा वेग कमी होईल, असेही तज्ज्ञ सुचवतात.
-जवळपास वाळू किंवा चिखल असल्यास, स्टेयरिंग व्हील नियंत्रित करा आणि वाळू किंवा खडीवरून वाहन चालवा. यामुळे कारचा वेग कमी होईल.
-गेअर्स बदलताना हँडब्रेकचा योग्य वापर करा.
-जेव्हा कार पहिल्या गियरमध्ये असते आणि वेग सुमारे 40 किमी प्रतितास असतो तेव्हा तुम्ही वेग नियंत्रित करण्यासाठी हँडब्रेक लावू शकता.
-हँडब्रेक अचानक जास्त वेगाने लावू नका कारण यामुळे मागील चाके लॉक होऊ शकतात आणि कार उलटण्याचा धोका वाढतो.