Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Pune Crime News: पिंपरी चिंचवडचे पोलीस अक्षीत आणि त्याचा साथीदार मयांक गोयलच्या अटकेसाठी जयपूरमध्ये गेलेत. मात्र, अटक टाळण्यासाठी आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर कार घातली.
पुणे: गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिट अँड रनची अनेक प्रकरणे समोर आली आहे, अशातच पोलिसांकडून अटक टाळण्यासाठी आरोपीने पिंपरीतील एपीआयच्या अंगावर गाडी घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, पिंपरी चिंचवडमधील एपीआय प्रवीण स्वामींच्या अंगावर एका आरोपीने थेट गाडी घातली. जयपूरमध्ये घडलेल्या या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
नेमकं काय घडलं?
आरोपी अक्षीत गोयलला काहीही करून बेड्या ठोकायच्या, या उद्देशाने जीवाची पर्वा न करता स्वामी थेट स्कॉर्पिओ गाडीच्या समोर उभे ठाकले होते. मात्र, हीच अटक टाळण्यासाठी अक्षीतने चालकाला गाडी अंगावर घालण्याच्या सूचना दिल्या. चालकाने ही पुढचा मागचा विचार न करता, थेट स्वामींच्या अंगावर गाडी घातली. स्वामींनी त्यांना रोखण्यासाठी बोनेट वर उडी घेतली, मात्र गाडीचा वेग वाढल्यानं ते बाजूला फेकले गेले. अशाप्रकारे अक्षीत पोलिसांच्या जाळ्यातून निसटला. याप्रकरणी अक्षीत आणि चालकावर जयपूरमध्येचं हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद #crimenews #Punenews #PUne pic.twitter.com/ST5pQokTmh
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) September 27, 2024
पिंपरी चिंचवडचे पोलीस अक्षीत आणि त्याचा साथीदार मयांक गोयलच्या अटकेसाठी जयपूरमध्ये गेलेत. हे दोघे पोलीस असल्याचं सांगून अनेकांना गंडा घालत होते. पिंपरी चिंचवडमधील एकाला अटकेची भीती दाखवून, या दोघांनी एक कोटी आठ लाखांना गंडा घातला. या प्रकरणात अक्षीत आणि मयांकला बेड्या ठोकण्यासाठी एपीआय प्रवीण स्वामी पथकासह जयपूरला गेले. काल स्वामींच्या पथकाने मयांकला सापळा रचून अटक केली, त्याच्या मार्फत ते अक्षीत पर्यंत पोहचले.
मात्र, एका ठिकाणी अक्षीत काळ्या स्कॉर्पिओमध्ये बसला होता. त्याला मुसक्या आवळण्यासाठी स्वामींच्या पथकाने स्कॉर्पिओला घेरलं. गाडी चालू स्थितीत होती, अक्षीत बाजूच्या सीटवर होता, स्टेरिंग चालकाच्या हाती होतं. हे पाहता ते पळ काढू शकतात. ही शक्यता गृहीत धरून स्वामी गाडी समोरचं उभे राहिले. काहीही झालं तरी अक्षीतला ताब्यात घ्यायचं यासाठी स्वामींनी जीवाची पर्वा केली नाही. पथकातील इतरांनी अक्षीत बसलेल्या बाजूचं दार उघडून त्याला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. मात्र त्याचवेळी अक्षीतने चालकाला गाडी स्वामींच्या अंगावर घालण्याच्या सूचना दिल्या. चालकाने ही पुढचा मागचा विचार न करता थेट स्वामींच्या दिशेने गाडी घातली. तरी स्वामी समोरून हलले नाहीत, चालकाने गाडीचा वेग वाढवला. स्वामींनी थेट बोनेट वर उडी घेतली अन ते बाजूला फेकले गेले. अशा रीतीने अक्षीतने पोलिसांच्या जाळ्यातून स्वतःची सुटका करून घेतली. हा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या धक्कादायक घटनेनंतर अक्षीत आणि चालकावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर ही स्वामींनी तपास थांबवला नाही, अक्षीतच्या शोधात असतानाच स्कॉर्पिओ गाडी ताब्यात घेतली आहे.