Shivsena UBT: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील तीन माजी नगरसेवकांची शिवसेनेतून हकालपट्टी; नेमकं काय आहे कारण?
Shivsena UBT: शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान हकालपट्टी केलेल्या माजी नगरसेवकांनी पक्षांतरासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची चर्चा आहे.
पुणे: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा हालचालींना वेग आला आहे, शिवसेना (Shivsena UBT) ठाकरे गटाकडून पुण्यातील तीन माजी नगरसेवकांची (former corporators) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, शिवसेनेच्या ध्येयधोरणाच्या विरोधात भूमिका घेतल्याने पुणे महापालिकेतील माजी नगरसेवक (former corporators) पबाळा ओसवाल, विशाल धनवडे, पल्लवी जावळे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान हकालपट्टी केलेल्या माजी नगरसेवकांनी पक्षांतरासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची चर्चा आहे.
महानगरपलिका निवडणुकीआधी ठाकरेंना पुण्यात मोठा धक्का
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीमध्ये अपयश आलं, त्यानंतर आता महानगर पलिकेच्या निवडणुकीआधी पुन्हा एकदा पुण्यात मोठा धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या नेत्यांनी आधीच कारवाई केल्याची माहिती आहे. पक्षाचे पाच माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर असून, त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे. 5 जानेवारीला मुंबईत पक्षप्रवेश होणार असल्याच्या चर्चा आहेत. मागील दोन - तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याचे संकेत मिळत आहेत. अशातच बदलाचे वारे दिसून येत आहे. या दरम्यान राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान या निवडणुकीवेळी इनकमिंग होण्याची आणि मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे.
कोण आहेत ते नगरसेवक?
विशाल धनवडे, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट, संगीता ठोसर हे पाच माजी नगरसेवक उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात धनवडे, ओसवाल यांनी आपल्या सोशल मिडियावरती सूचक पोस्ट शेअर केल्या. 5 जानेवारीला मुंबईमध्ये फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती चर्चा आहे, दरम्यान या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ऐन निवडणुकीआधी मोठा धक्का बसणार आहे. तर त्याआधी माजी नगरसेवक बाळा ओसवाल, विशाल धनवडे, पल्लवी जावळे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
पुण्यातील शिवसेना ठाकरेंच्या पक्षाच्या पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच या नगरसेवकांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे, पुढील आठवड्यात त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.