Elgar Parishad | एल्गार परिषदेला पोलिसांची परवानगी; 30 जानेवारीला पुण्यात आयोजन
अखेर एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी परवानगी दिली असून 30 जानेवारी रोजी पुण्यात या परिषदेचं आयोजन करण्यात येणार आहे.
Elgar Parishad : 30 जानेवारी रोजी घेण्यात येणाऱ्या एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी अखेर परवानगी दिली आहे. या परिषदेचं आयोजन स्वारगेट येथील श्री गणेश क्रीडा कला मंच येथे करण्यात येणार आहे. कोरोनामुळे या परिषदेला केवळ 200 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी एल्गार परिषदेच्या आयोजनाच्या परवानगीसाठी स्वारगेट पोलिसांकडे अर्ज केला होता. त्यावेळी पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव परवानगी नाकारली होती. त्यामुळे कोळसे पाटलांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. पण अखेर पोलिसांनी एल्गार परिषदेला परवानगी दिली आहे. परंतु, या परिषदेसाठी अटी-शर्थींसह परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केवळ 200 व्यक्तींनाच पुणे पोलिसांकडून या परिषदेसाठी परवानी देण्यात आली आहे. त्याचसोबत कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही, याचीही खबरदारी आयोजकांना घ्यावी लागणार आहे, अशी अटही पुणे पोलिसांना घातली आहे.
पाहा व्हिडीओ : पुण्यात होणाऱ्या एल्गार परिषदेला पोलिसांची परवानगी
दरम्यान, ही एल्गार परिषद निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांना 31 डिसेंबर रोजी घ्यायची होती. परंतु, त्यावेळी मात्र या परिषदेसाठी पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर तब्बल एक महिना उलटल्यानंतर पोलिसांकडून ही परवानगी देण्यात आली आहे.
यापूर्वी 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यातील शनिवार वाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद वादग्रस्त ठरली होती. या परिषदेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच, 1 जानेवारी 2018 या दिवशी कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी एल्गार परिषदेचा संबंध कोरेगाव भीमा येथे घडलेल्या हिंसाचाराशी जोडला होता. याप्रकरणाचा तपास अद्याप सुरु आहे. तसेच देशभरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत याप्रकरणी अद्यापही तुरुंगात आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी 31 डिसेंबर रोजी या परिषदेला परवानगी नाकारल्याचं बोललं जात आहे. परंतु, आता 30 जानेवारीला ही परिषद घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.