(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Dengue Cases: पुणेकरांना आता डेंग्यूचा सं'ताप'; शहरात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण
पुणे शहरात यंदा डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या 26 दिवसांत आतापर्यंत डेंग्यूचे 52 रुग्ण आढळू आले आहेत.
Pune Dengue Cases: पुणे (Pune) शहरात यंदा डेंग्यूचे (Dengue) सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. नगर रोड, औंध-बाणेर, हडपसर आणि सिंहगड रोड परिसरात मोठ्या संख्येने रुग्ण आढळले आहेत. 58% रुग्ण हे या चार वॉर्डमधील आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेने दिली आहे. या महिन्यात शहरात पावसाला सुरुवात झाली. शहरातील अनेक भागांमध्ये पाणी तुंबलं. त्यामुळे डासांची संख्या झपाट्याने वाढली. पुणे शहरात गेल्या 26 दिवसांत आतापर्यंत डेंग्यूचे 52 रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. शहरात दररोज किमान दोन डेंग्यूचे नवीन रुग्ण आढळून येत असल्याने खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.
डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. तुमच्या घरात आणि घराच्या, सोसायटीच्या आवारात पाणी साचू देऊ नका. साचलेल्या स्वच्छ पाण्यात डासांची उत्पत्ती होण्याचा धोका आहे. तसंच, तुम्हाला ताप, अंगदुखी, पुरळ यासारखी लक्षणे आढळल्यास ताबडतोब तपासणी करा, असं पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितलं आहे.
मागील आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. विविध भागात साचलेल्या स्वच्छ पाण्यावर डासांची संख्या वाढली आहे. डेंग्यू हा एडिस इजिप्ती डासामुळे होतो. हा डास पावसाच्या स्वच्छ पाण्यावर अंडी घालतो आणि डेंग्यू हा डासांमुळे पसरतो. त्यामुळे काही दिवसांपुर्वी पावसाचं पाणी किंवा परिसरात पाणी साचू देऊ नका, स्वच्छता बाळगा. घरात देखील पाण्याची साठवणूक करु नका, अशा सुचना पालिकेकडून नागरिकांना देण्यात आल्या होत्या.
1 जानेवारी ते 25 जुलै या कालावधीत महापालिकेत डेंग्यूच्या 195 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी जुलै महिन्यात सर्वाधिक म्हणजेच 52 रुग्ण आढळले आहेत . मे आणि जून या दोन्ही महिन्यात शहरात पाऊस पडला नाही. त्यामुळे मे महिन्यात 18 तर जूनमध्ये 17 रुग्ण आढळले होते. मात्र एप्रिल महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये 42 पर्यंत वाढ झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.