Dattatray Gade Arrested : नराधम दत्ता गाडेला पकडून देण्यासाठी स्थानिकांची पोलिसांना केली मोठी मदत, शेवटी पकडणाऱ्या ग्रामस्थाने सांगितलं कारण
Dattatray Gade Arrested : आरोपीला पकडण्यासाठी 72 तासांचा विलंब झाला होता, अशातच गावाची बदनामी रोखण्यासाठी शोधमोहिमेत गावातील लोकांनी सहभाग घेतला.

शिरूर : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाहीमध्ये नराधम दत्तात्रय गाडे याने 26 वर्षीय तरूणीवर दोन वेळा बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे, त्यानंतर तो त्याच्या मुळवारी शिरूर तालुक्यातील गुनाट या गावी गेला, आणि त्या ठिकाणी लपून बसला होता, त्याच्यामुळे गावाची सर्वत्र बदनामी झाली. अशा कृत्यांना गावातील लोकांनी समर्थन नाही, हे दाखवून देण्यासाठी गणेश गव्हाणे ग्रामस्थ देण्यासाठी मी आणि गावकरी शोधमोहिमेत सहभागी झालो. 72 तासांच्या शोधानंतर गाडेला पकडले. त्याला पकडण्यासाठी 500 पोलिसांचा फोजफाटा, इतर टीम, ड्रोन, श्वान टीम यांच्यासह ग्रामस्थ नराधमाचा तपास करत होता. गावाची होणारी बदनामी थांबवल्याचे गाडेला पकडण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे गणेश गव्हाणे यांनी त्या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
गणेश गव्हाणे यांनी त्या घटनेबाबत दिली सविस्तर माहिती
गणेश गव्हाणे याबाबत म्हणाले, स्वारगेट प्रकरणातील आरोपी गाडे हा आमच्या गावातील रहिवासी आहे, याची माहिती आम्हाला मिळाली. गावासाठी ही गोष्ट भूषणावह नव्हती. गावाची आणि ग्रामस्थांची बदनामी होऊ नये म्हणून माझ्यासह ग्रामस्थ पोलिसांच्या आवाहनानंतर शोधमोहिमेत सहभागी झाले होते. दुपारी चार ते साडेसहा वाजेपर्यंत गुणाट-निर्वी शिव भागातील तीन एकर परिसरातील उसाच्या फडात शोध घेण्यात आला. मात्र या शोधमोहिमेत गाडे सापडला नाही. अंधारामुळे मोहिमेचा पहिला टप्पा थांबवण्यात आला. यामध्ये श्वान पथक, ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेतली गेली होती.
त्यानंतर पुन्हा एकदा सर्वांनी जेवण करून पुन्हा रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा शोधमोहीम सुरू केली. चांदणशीव वस्ती येथे बहिरट यांच्या घरी गाडे पाणी पिण्यासाठी येऊन गेल्याची माहिती मिळताच अनेक जण तिकडे पोहोचले. साडेदहा ते एक वाजेपर्यंत या भागात पथके करून सर्वजण शोध घेत होतो. अखेर कंटाळून सर्व सहकारी व मी येथील क्रिकेटच्या मैदानावर खाली बसलो. दुसऱ्या ठिकाणी काय चाललं आहे, हे बघण्यासाठी मी माझ्या दुचाकीवरून निघालो. माझी गाडी वळवताना मला गाडीच्या उजेडात काही अंतरावर कोणीतरी व्यक्ती उसाच्या बाहेर विहिरीच्या कडेला बसल्याचे दिसले. मी बारकाईने पाहिलं तो संशयित गाडेच असल्याची माझी खात्री झाली. ही बाब मी हळूच सहकाऱ्यांना सांगितली. त्यानंतर सर्वांनी मिळून आम्ही त्याला पकडलं. ज्यावेळी त्याला पकडलं त्यावेळी गाडेनं मला माझ्या मुलाशी बोलायचं आहे, अशी विनंती केली. उपस्थित आम्ही सर्व थोडे चितेंत आलो. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
...तर त्यानं विष पिलं असतं
चांदणवस्ती येथील विहिरीच्या काठावर बसलेल्या गाडेला पकडण्यासाठी आम्ही सर्व चोहोबाजूंनी जात होते. त्यावेळी त्याच्या हातात काही तरी चमकताना दिसलं. ती बाटली होती. माझ्या सोबत असणाऱ्यांच्या मदतीने मी पळत जाऊन गाडेला मिठी मारली. तसे इतर सहकारी सौनिक वळू, मनोज गव्हाणे, अरविंद घोडके, सुभाष बुलाखे, राजाराम वळू यांनी पळत येऊन त्याला पकडलं. त्याच्या हातात रोगार या कीडनाशकाची बाटली होती. थोडा उशिर झाला असता तर त्यानं ते विष पिलं असतं, असं गव्हाणे यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीमध्ये सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
