Pune News : पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयावरील घड्याळ चिन्ह हटवलं; शहराध्यक्ष प्रशांत जगतापांच्या डोळ्यात पाणी
शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कार्यालयावरील घड्याळ चिन्ह हटवलं. कार्यालयावरील चिन्ह काढताना डोळ्यांमध्ये अश्रु अनावर झाले. जगताप यांनी आपल्या गाडीवरील सुद्धा घड्याळ चिन्ह कढून टाकले.
पुणे : निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आल्यानंतर आता त्याचे पडसाद कार्यालयांमध्येही उमटू लागले आहेत. पक्ष आणि चिन्हाचा फैसला झाल्यानंतर राज्यातील कार्यालयांमध्ये सुद्धा वाद जाऊन पोहोचला आहे. आज (7 फेब्रुवारी) पुण्यामध्ये शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कार्यालयावरील घड्याळ चिन्ह हटवलं. यावेळी कार्यालयावरील चिन्ह काढताना डोळ्यांमध्ये अश्रु अनावर झाले. जगताप यांनी आपल्या गाडीवरील सुद्धा घड्याळ चिन्ह कढून टाकले. 24 वर्षापासून कार्यालय पाहत असताना हे दिवस येतील, असे वाटलं नव्हतं, असे ते म्हणाले.
दरम्यान, पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कार्यालयावरील चिन्ह काढण्यात आल्यानंतर नाव देखील काळ्या कापडाने झाकण्यात आला आहे. शरद पवारांकडून चिन्ह आणि नाव गेल्यानंतर पुण्याचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप भावूक झाले. चिन्हाची पाटी काढताना जगताप यांच्या डोळ्यात अश्रू आले.
चिन्ह काढून पाटी झाकण्यात आल्यानंतर अजित पवार गटाचा कार्यकर्ता यावेली जाब विचारण्यासाठी पोहोचला. अजित पवारांच्या नावाची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप करत जाब विचारण्याचा पयत्न केला. अजित पवार गट उपाध्यक्ष दत्ता सागरे आक्रमक झाले. यानंतर पोलिसही याठिकाणी पोहोचले. अप्पर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
शरद पवार गटाचं नाव ठरलं
दरम्यान शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar) हे नाव मिळालं आहे. शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने हे नाव दिलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे नाव देण्यात आलं असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षाच्या चिन्हावर मात्र अद्याप काही निर्णय झालेला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाकडे गेल्यानंतर शरद पवार गटाला नव्या नावासाठी आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाला (Election Commission Of India) काही पर्याय द्यायचे होते. त्यामध्ये शरद पवार गटाने नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार , नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार ही तीन नावं दिली होती. त्यामध्ये निवडणूक आयोगाने 'नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' म्हणजे 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' हे नाव त्यांना दिलं आहे.
अजित पवारांसोबत कोण?
- महाराष्ट्रातील 41आमदार
- नागालँडमधील 7आमदार
- झारखंड 1आमदार
- लोकसभा खासदार 2
- महाराष्ट्र विधानपरिषद 5
- राज्यसभा 1
शरद पवारांसोबत कोण?
महाराष्ट्रातील आमदार 15
केरळमधील आमदार 1
लोकसभा खासदार 4
महाराष्ट्र विधानपरिषद 4
राज्यसभा -3
पाच आमदारांनी व एका खासदाराने दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे
इतर महत्वाच्या बातम्या