Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस यांची ट्विटरवर बदनामी; पुण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल
ट्विटरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची बदनामी करण्याऱ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Devendra fadanvis: ट्विटरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची बदनामी करणाऱ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ट्विटरवर फडणवीसांविरोधात वक्तव्य करुन आणि तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 96 कुळी मराठा या ट्विटर आयडी धारक ट्विटरवर देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात ट्विट करत होता. अनिल हरपळे असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्विटर धारकाचं नाव आहे.
याप्रकरणी संदीप सोमनाथ सातव यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कारवाई केली आहे. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र जितक्या शिव्या खातात तितक्या कोणी खात नसेल. काही वर्षात तुमचा नारायण राणे होईल, असे ट्वीट आणि त्यासोबत देवेंद्र फडणवीस यांचे स्टेटमेंट जोडले आहे. या ट्विटवरुन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
त्यात तुमच्यासोबत 24 तास सोबत राहणारा, सत्ता भोगणारा व्यक्ती खंजीर खुपसतो, माझ्यासोबत तुम्ही बेईमानी कराल तर मी बदला नक्कीच घेईन, बेईमानाला जागा दाखवावी लागते, दाखवली, होय मी बदला घेतला,असे ट्विट केलेले आहे. त्यात वर अनिल हरपळे (पाटील) 96 कुळी मराठा या ट्विटर आयडीवरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आणि त्या फोटोवर समाजातील दोन गटांमध्ये शांतता, एकोपा, बिघडवण्याच्या उद्देशाने द्वेष भावना वाढीस घालून ट्वीट करुन फडणवीस यांची बदनामी केली, असे तक्रारदाराने म्हटलं आहे.
अमृता फडणवीसांबाबत कमेंट करणं महागात पडलं
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं होतं. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा गावातील तरुणाला पोलिसांनी अटक केली होती. अमित सुदाम वायकर (रा. कावळेमळा, चाळकवाडी-पिंपळवंडी, ता. जुन्नर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव होतं.
जुन्नर तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्या आशा बुचके यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल अश्लिल आणि खालच्या पातळीची भाषा वापरली असा आरोप या तक्रारीत केला होता. अर्वाच्च भाषा वापरत कमेंट सोशल मीडियावर पोस्ट केली होती. पक्षाच्या नसल्या किंवा अमृता फडणवीस जरी असल्या तरी देखील महिलेबाबत अशा भाषेत कमेंट करणे योग्य नाही. त्या आमच्या नेत्यांच्या पत्नी आहेत. त्यांच्याबाबत अशी कमेंट करुन आमच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला होता.