Pune Bypoll election : कसबा पोटनिवडणुकीसाठी हिंदू महासंघ रिंगणात; आनंद दवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हिंदू महासंघाकडून आनंद दवे यांनी आज निवडणूक अर्ज दाखल केला.
Pune Bypoll election : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हिंदू महासंघाकडून आनंद दवे यांनी आज निवडणूक अर्ज दाखल केला (Kasba Bypoll Election). भाजपकडून दिवंगत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर ब्राम्हण समाजाला डावललं जात असल्याचा आरोप हिंदू महासंघाकडून करण्यात आला आणि त्यांनी पोटनिवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला. आनंद दवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सारस बागेजवळील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून निवडणूक अर्ज दाखल केला.
यावेळी मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आलं असून त्यावेळी हिंदू महासंघाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी हातात भगवे झेंडे घेत आणि मुक्ता टिळकांचा फोटो घेत शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी घोषणाबाजीदेखील करण्यात आली. सारसबागेच्या गणपतीचं दर्शन घेऊन अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आनंद दवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
खुल्या प्रवर्गाचा आवाज विधानसभेत पोहोचवण्यासोबतच पुणेश्वराला मुक्त करणे तसेच स्वच्छ, सुंदर कसबा हे आपले ध्येय असल्याचे दवे यांनी सांगितलं आहे. काल आनंद दवेंनी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी ते म्हणाले होते की, भाजपला काही जातींची केवळ मते हवी असतात. त्या जाती नकोच असतात. टिळकांना उमेदवारी न दिल्याने आज खुल्या प्रवर्गाचा आवाज दाबण्याचा आज पुन्हा प्रयत्न झाला आहे. सर्वच जातींना योग्य प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे याच भावनेतून आम्ही हिंदू महासंघ परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे कसबा मतदारसंघ निवडणूक लढवणार आहोत, असं ते म्हणाले होते.
कसब्याची निवडणूक चुरशीची आहे. ज्या भाजपची लोकं टिंगल उडवत होते. त्याचवेळी भाजपला वाढण्यासाठी एकमेव ब्राह्मण सामाजाने साथ दिली. त्या समाजाला वाळीत टाकण्याचं काम भाजप करताना दिसत आहे. कोथरुड पाठोपाठ कसब्यातही तेच चित्र बघायला मिळालं. जगताप कुटुंबीयांना चिंचवडमध्ये न्याय देण्यात आला, तोच न्याय टिळकांच्या घरात का दिला नाही, असा प्रश्न आनंद दवे यांनी केला होता. हिंदू समाजातील सर्व जातींना योग्य प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. पुणे जिल्ह्यात 21 आमदार असताना प्रत्येक समाजाचे प्रतिनिधित्व असताना ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधित्व का डावलले गेले, असा प्रश्न आनंद दवे यांनी भाजपला केला होता. ब्राह्मण समाजाची मागणी हिंदू महासभेपर्यंत आल्यानंतर मी स्वत: रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपला ही धोक्याची सूचना आहे. हिंदू महासंघाचा उमेदवार इथं निवडून येईल, अशी माझी खात्री असल्याचे दवे म्हणाले.