(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar: अजितदादांच्या 'NCP'त ऑल इज नॉट वेल, चाकणकरांना विधानपरिषदेवर पाठवण्यासाठी मोठ्या महिला नेत्याचा विरोध, म्हणाल्या, 'एकालाच किती...'
rupali chakankar: रूपाली चाकणकर यांना विधानपरिषदेवर संधी मिळणार असल्याच्या चर्चेवर आता त्यांच्याच पक्षातील रूपाली ठोंबरे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. एकाच महिलेला किती पद देणार असा सवाल रूपाली ठोंबरे यांनी उपस्थित केला आहे.
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषदेसाठी तीन नावांची लवकरच शिफारस केली जाणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषदेसाठी रूपाली चाकणकर (Rupali Chakankar), सिद्धार्थ कांबळे (Siddharth Kamble) आणि आनंद परांजपे (Anand Paranjape) यांची नावे दिली जाण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. ओबीसी एससी घटकाला न्याय देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यादरम्यान रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना विधानपरिषदेवर संधी मिळणार असल्याच्या चर्चेवर आता त्यांच्याच पक्षातील रूपाली ठोंबरे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. एकाच महिलेला किती पद देणार असा सवाल रूपाली ठोंबरे (Rupali Patil) यांनी उपस्थित केला आहे.
रूपाली ठोंबरेंची सोशल मिडिया पोस्ट
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली ठोंबरे (Rupali Patil) यांनी त्यांच्या सोशल मिडियावर पोस्ट लिहली आहे. त्यामध्ये त्यांनी अजित दादा न्याय नक्की देतील असा विश्वास देखील व्यक्त केला आहे. "एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार आमचे मा.अजित दादा न्याय नक्की देतील असा विश्वास आहे. एकाच महिलेला किती पदे देणार? काल पासून बातमी वाचत आहे,बातमीची शहानिशा केली तर पक्षाने कोणतेही पत्र अधिकृत दिले नाही असे सांगितले. पक्षाला कळकळीची विनंती असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये इतरही महिला आहेत त्या सक्षमतेने,दमदार कामाने मोठ्या आहेत. पक्षात कर्तुत्वान महिला खूप आहेत त्या सक्षम,काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा इतर महिलांना समान संधी द्यावी. ही विनंती असेल", अशी पोस्ट त्यांनी आपल्या सोशल मिडियावरती लिहली आहे.
मी पण अजितदादाची लाडकी बहीण; मी पण विधान परिषदेसाठी इच्छुक
याबाबत प्रतिक्रिया देताना रूपाली ठोंबरे (Rupali Patil) म्हणाल्या, राज्यपाल नियुक्त आमदाराबाबत जे नावं चर्चेत आहेत,त्या बातम्या पेरण्यात आलेल्या आहेत. रुपाली चाकणकर यांच्याकडे आधीच महिला आयोगाचे अध्यक्ष पद आणि महिला प्रदेशाध्यक्ष अशी दोन पद आहे. एक व्यक्ती आणि एक पद असा निकष असला पाहिजे. मी पण अजितदादाची लाडकी बहीण आहे, त्यामुळे मी पण विधान परिषदेसाठी इच्छुक आहे. रुपाली चाकणकर यांचे नाव निश्चित झाल्यास त्याला आमचा विरोध असणार आहे, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
त्याचबरोबर या प्रकरणी मी अजितदादाशी प्रत्यक्ष भेटून बोलणार आहे. रूपाली चाकणकर यांनी काय केलं काय बोलल्या याच्याशी मला काहीही घेणं नाही. त्यांचा माझा बांधाला बांध नाही. आम्ही आमची मागणी अजितदादा यांच्या जवळ मांडली आहे. पक्षात इतरही महिला आहेत, असं म्हणत एक प्रकारे रूपाली ठोंबरे (Rupali Patil) यांनी चाकणकर यांच्या नावाला विरोध दर्शवला आहे.
विधानपरिषदेसाठी या तीन नावांची चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषदेसाठी रूपाली चाकणकर (Rupali Chakankar), सिद्धार्थ कांबळे (Siddharth Kamble) आणि आनंद परांजपे (Anand Paranjape) यांची नावे दिली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. ओबीसी एससी घटकाला न्याय देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यापूर्वीच अजित पवारांकडून विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी विधान परिषदेच्या जागा भरण्याचे सुतोवाच करण्यात आले होते. याबाबतची माहिती एबीपी माझाला सुत्रांनी दिली आहे.