Pune Car Accident: माझी आवडती कार, माझा बाप बिल्डर असता तर...? पुण्यात निबंध स्पर्धेचे आयोजन, वयोगट 17 वर्षे 8 महिने ते...
Pune News: पुण्यातील कल्याणीनगर परिसरात राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन. पुण्यातील अपघाताच्या घटनेनंतर युवक काँग्रेसकडून निबंध स्पर्धेसाठी खास विषयांची निवड. 11 हजारांचे पारितोषिक. माझा बाप बिल्डर असता तर ?
पुणे: पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या अपघातानंतर येरवाडा पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी धनिकपुत्राला पाठिशी घालण्यासाठी कायद्याची ऐशीतैशी केल्याचे आरोप होत आहे. प्राथमिक चौकशीत या आरोपांमध्ये काहीप्रमाणात तथ्य आढळल्याने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना (Pune Police) निलंबित करण्यात आले आहे. पुण्यातील आणि राज्यातील बडे राजकीय नेते या संपूर्ण प्रकरणावर फारसे बोलायला तयार नाहीत. केवळ काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी हे प्रकरण लावून धरले आहे. यानंतर आता पुणे युवक काँग्रेसने चक्क राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. (Pune Car Accident)
पुणे युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेसाठी निवडण्यात आलेले विषय अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या स्पर्धेत प्रथम विजेत्याला 11 हजार 111 रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. 17 वर्षे 8 महिने ते 58 वर्षे वयोगटाचे नागरिक या स्पर्धेत भाग घेऊ शकतील. कल्याणीनगर परिसरात बॉलर पबसमोर रविवारी सकाळी ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते या स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक देण्यात येईल. या स्पर्धेची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. आता पुणेकर या स्पर्धेला कितपत प्रतिसाद देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
निबंध स्पर्धेचे विषय खालीलप्रमाणे
* माझी आवडती कार ( पॉर्शे ,फरारी,मर्सिडीज,)
* दारूचे दुष्परिणाम
* माझा बाप बिल्डर असता तर?
* मी खरंच पोलीस अधिकारी झालो तर?
* अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण?
अग्रवाल कुटुंबीयांच्या पाठिशी चौकशीचा ससेमिरा
पुण्यातील पोर्शे कार दुर्घटनेनंतर पोलिसांकडून तपासात झालेली दिरंगाई आणि चालढकल समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संपप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. नागरिकांचा रोष वाढल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आले होते. यानंतर पुणे पोलीस दल खडबडून जागे झाले. मात्र, स्थानिक पोलिसांकडून याप्रकरणात धनिकपुत्राला झुकते माप दिल्याचा संशय असल्याने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
याप्रकरणातील मुख्य आरोपी अल्पवयीन असल्याचे त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. 5 जूनपर्यंत त्याचा मुक्काम बालसुधारगृहात असेल. तर आरोपीचे वडील विशाल अग्रवाल सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी ड्रायव्हरला धमकावणे आणि खोलीत डांबून ठेवल्याप्रकरणी अटक केली आहे. त्यांना लवकरच न्यायालयात हजर केले जाईल.
आणखी वाचा