Pooja Khedkar: ऑडी कारला लाल-निळा दिवा अन् VIP नंबरप्लेट, वरिष्ठ अधिकाऱ्याचं अँटी चेंबर बळकावून स्वत:चं कार्यालय थाटणाऱ्या पूजा खेडकर कोण?
Pune News: श्रीमंती राहण्याचा थाट अन् चमकोगिरीचा हव्यास नडला, पुण्यातील अधिकारी पूजा खेडकरांची थेट वाशिमला बदली. त्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत.
पुणे: पुण्यातील प्रोबेशनरी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नव्यानेच प्रशासकीय सेवेत रुजू झालेल्या पूजा खेडकर यांच्या बड्या अधिकाऱ्यांनाही लाजवतील अशा मागण्या आणि 'कारनामे' अलीकडच्या काळात चर्चेचा विषय ठरत होते. या सगळ्या वादानंतर आता पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांची पुण्यातून (Pune) उचलबांगडी करुन त्यांची बदली थेट वाशिमला करण्यात आली आहे. त्या आता वाशिमच्या जिल्हाधिकारी (Washim District) असतील. मात्र, यानिमित्ताने सरकारी बाबूंच्या वर्तुळात होणारी चर्चा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
पूजा खेडकर प्रोबेशन पिरीयडवर असतानाही अधिकारी असल्याच्या थाटात राहायच्या. त्यांच्या या सगळ्या थाटाच्या सुरस चर्चा आता एक-एक करुन समोर येत आहेत. नियम सांगतो कि खासगी गाडीवर ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी लावणे अयोग्य आहे. पण पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनवर रुजू असणाऱ्या 2022 बॅच IAS डॉ. पूजा खेडकर यांनी VIP नंबर असलेल्या खासगी ऑडी गाडीला महाराष्ट्र शासन असा बोर्ड लावून घेतला. शिवाय या खासगी गाडीला लाल आणि निळा दिवा पण लावून घेतला होता. ऑडी कंपनीच्या अलिशान गाडीला लोगो आणि दिवा लावून कार्यालयात येणारे असे हे मोठे अधिकारी कोण याची चर्चा नेहमी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात व्हायची. विशेष म्हणजे या अधिकारी मॅडम त्यांच्या या गाडीचे दिवे दिवसासुद्धा चालू ठेवतात. या अधिकारी मॅडमचे ‘कार’नामे फक्त कार पुरते मर्यादित नसून वरिष्ठ अधिकारी शासकीय कामासाठी मुंबईला मंत्रालयात गेले असताना त्यांचे अँटी चेंबर बळकावून या अधिकारी मॅडमनी चक्क वरिष्ठांच्या अँटी चेंबरचे सामान बाहेर काढून तिथे स्वतःचे कार्यालय थाटले आणि स्वतःच्या नावाचा बोर्डसुद्धा लावला होता, अशी माहिती आता समोर आली आहे.
त्यांच्या या वर्तनाबद्दल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अप्पर मुख्य सचिव मंत्रालय यांच्याकडे अहवाल दाखल केला असून या अहवालात कलेक्टर साहेबांनी ‘माझे कार्यालय हे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या शेजारीच हवे तसेच मला शिपाई पाहिजे आणि हीच गाडी पाहिजे’ असा अधिकारी मॅडमचा हट्ट आहे असा उल्लेख केला. अधिकारी मॅडमचे वडील दिलीप खेडकर हे जिल्हाधिकारी कार्यालयात येतात आणि तिथल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना दम देतात कि, तुम्ही सगळे माझ्या मुलीला त्रास देत आहात, तुमच्या उभ्या आयुष्यात तुम्हाला तिच्याएवढी पोस्ट मिळणार नाही. माझ्या मुलीला त्रास दिला तर तुम्हाला पण भविष्यात या गोष्टीचा त्रास होईल, अशी धमकी सुद्धा देतात, अशी चर्चा सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तुळात होती.
अनाठायी आग्रह करून दुरुस्त केलेले कार्यालयसुद्धा अधिकारी मॅडमना आवडले नाही. प्रोबेशनवर असणाऱ्या अधिकाऱ्याना गाडी, शिपाई, दालन तसेच इत्यादी सोयीसुविधा पुरवण्याचे कुठीलीही शासकीय तरतूद नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय त्यांना वापस देण्याचे सूचित केले. त्यावर पूजा खेडकर यांनी whatsapp मेसेज करून हा माझा अपमान झाल्याचे म्हटले आहे. प्रोबेशनवर असणाऱ्या या अधिकाऱ्याची वर्तणूक प्रशासकीय अधिकाऱ्याला शोभेल अशी नाही. जिल्ह्यातील शासकीय कामकाज व्यवस्थित चालण्यासाठी त्यांना प्रशिक्षणासाठी जिल्हा बदलून द्यावा' असा विस्तृत शेरा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अहवालात दिला आहे.
सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तुळातील कुजबुज चव्हाट्यावर
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पूजा खेडकर यांच्या राहणीमानाची आणि अवास्तव मागण्यांची सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तुळात चांगलीच चर्चा रंगत होती. अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी उघडपणे बोलत नसले तरी पूजा खेडकर यांच्याविषयीची कुजबूज चर्चेचा विषय ठरत होती. नव्या नव्या अधिकाऱ्यांना एवढा माज कशाचा आहे ? 10-15 वर्षांपूर्वी व त्या आधी शासकीय सेवेत रुजू झालेल्या अधिकाऱ्यांना आपल्या कामाप्रती अन अधिकाराप्रती प्रचंड जागरूकता अन स्वभावात नम्रपणा आहे पण गेल्या 5-6 वर्षांपासून शासकीय सेवेत आलेल्या अनेक महाभागांचे नोकरीविषयीचे हेतू केवळ हवाबाजीचे आहेत. लवकर मोठे व्हायचे आहे, श्रीमंतीचे आयुष्य जगायचे आहे, रुबाब झोडायचा आहे. इंस्टाग्रामवर कुल राहायचे आहे. सोशल मीडियावर तत्वज्ञान झाडायचे आहे. अतिशय भंपक लाट ही गेल्या काही वर्षात प्रशासकीय सेवेत आली आहे. काही अपवाद वगळता नव्यापेक्षा पूर्वीचे जुने अधिकारी चांगले अशी म्हणायची वेळ आली आहे, असे जुन्या फळीतील अधिकाऱ्यांकडून खासगीत सांगितले जायचे.
आणखी वाचा
श्रीमंती राहण्याचा थाट अन् चमकोगिरीचा हव्यास नडला, पुण्यातील अधिकारी पूजा खेडकरांची थेट वाशिमला बदली