(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Navale Bridge Accident: अपघाताचं सत्र कधी थांबणार! सिमेंट मिक्सर गाडीवर पलटी झाल्याने नवले पुलावर मोठा अपघात; दोघे जखमी तर गाडीचं मोठं नुकसान
पुण्यातील नवले पुलावर अपघात सत्र सुरूच आहे. आज साडे अकराच्या सुमारास पुलावर अपघात झाला. सिमेंटचा मिक्सर पलटी झाल्याने हा अपघात झाला.
Navale Bridge Bccident: पुण्यातील नवले पुलावर अपघात सत्र सुरूच आहे. आज साडे अकराच्या सुमारास पुलावर अपघात झाला. सिमेंटचा मिक्सर पलटी झाल्याने हा अपघात झाला. एका चारचाकीवर सिमेंट चा मिक्सर पलटी झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या अपघातात 2 जण जखमी असून गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सकाळची वेळ असल्याने या अपघातामुळे वाहतूक कोंडी देखील झाली.
नेमकं काय घडलं?
नवले पुलावर सकाळच्या वेळी येजा-करणाऱ्यांची गर्दी असते. त्यामुळे वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होते. आज (15 जून) सकाळी साडे अकराच्या सुमारास भरधाव असलेला सिमेंटच्या मिक्सरचा ताबा सुटला. ताबा सुटल्याने मिक्सर एका चारचाकीवर पलटी झाला. यानंतर परिसरात गर्दी जमा झाली होती. या अपघातात 2 जण जखमी झाले असून त्याच्यावर पुढील उपचार सुरु आहे. कात्रजकडून नवले पुलाकडे येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा विचित्र अपघात झाला. त्यासोबतच गाडीचं देखील मोठं नुकसान झालं आहे. नवले ब्रिजची ओळख सध्या अपघाती ब्रिज होतोना दिसत आहे. भारती विद्यापीठ वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाली आहे.
या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरूच आहे. आजपर्यंत शेकडो लोकांना या अपघातांमध्ये आपला प्राण गमवावा लागला आहे. सतत होणाऱ्या या अपघातांकडे महामार्ग प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करण्यात आली आहे. होमहवन, प्रेतयात्रा अशी प्रतिकात्मक आंदोलने देखील करण्यात आली आहेत. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाल्याचे दिसत नसून अपघातांचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुण्यातील नवले पुलावर सातत्याने होणारे अपघात रोखण्यासाठी आता एक नवा प्रस्ताव समोर आला होता. नवले पुल आणि त्यापासून काही अंतरावर असलेला वडगाव पुल जोडण्यासंदर्भातला प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुणे महापालिकेला देण्यात आला होता. या ठिकाणी अपघातांमधे सतत होणारी जिवितहानी लक्षात घेता या प्रस्तावाची लवकरात लवकर अंमलबजावणी होईल अशी पुणेकरांना अपेक्षा आहे.