मोठी बातमी : अजितदादांच्या आमदारांचा प्रभाव असल्याचा दावा, प्रांतांच्या आरोपावर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचं जशास तसं उत्तर!
माझ्यावर आरोप असलेले पत्र हे मी आज पाहिले, मी एकाचवेळी जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून दोन पातळ्यांवर काम करत असतो.
पुणे : लोकसभा निवडणुकांच्या निकालापूर्वीच पुणे (Pune) जिल्ह्यातील राजकीय प्रभावावरुन थेट जिल्हाधिकाऱ्यांवरच गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राजकीय प्रभावातून जिल्हाधिकारी काम करत असल्याची तक्रार प्रशासनातील अधिकाऱ्याने केल्यामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. खेडचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) याबाबत तक्रार केली आहे. जोगेंद्र कट्यारे यांनी आयोगाकडे दिलेल्या तक्रारीत जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सुहास दिवसे हे अजित पवारांच्या (Ajit Pawar) आमदाराच्या दबावाखाली काम करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. खेड आळंदीतील राष्ट्रवादीच्या आमदारांच्या प्रभावाखाली जिल्हाधिकारी काम करत असल्याने निवडणूक निकालापूर्वीच त्यांची बदली करण्याची मागणी कट्यारे यांनी केली. त्यावर, आता जिल्हाधिकारी दिवसे यांनीही जशास तसे उत्तर दिलं आहे.
कट्यारे यांनी केलेल्या आरोपावर उत्तर देताना जिल्हाधिकारी दिवसे म्हणाले की, माझ्यावर आरोप असलेले पत्र हे मी आज पाहिले, मी एकाचवेळी जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून दोन पातळ्यांवर काम करत असतो. माझ्यावर आरोप करणाऱ्या कट्यारे यांनी यात गल्लत केलीय. कट्यारे यांची बदली करण्याचा अधिकार शासनाला आहे. मी जिल्हाधिकारी पदावर येण्याआधी कट्यारे यांच्याविरोधात तक्रारी आल्या होत्या आणि त्यांची चौकशी करण्यात येते आहे. कट्यारे यांच्याकडून जमीन अधिग्रहणाची भरपाई देण्याची जबाबदारी काढून घेण्यात आल्याने ते व्यथित झाले असावेत, असे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी म्हटले आहे.
प्रांताधिकारी कट्यारे यांनी भरपाई देण्याच्या निकालात अनेक बदल केलेले आहेत. कट्यारे यांनी आरोप करून नियमभंग केलेला आहे, कट्यारे यांनी जर चुकीचे काही केलेले नसेल तर त्यांनी तपासणीला घाबरण्याचे कारण नाही. राजकीय संबंध असल्याच्या आरोपांना उत्तर देण्यात अर्थ नाही, असे म्हणत पालकमंत्री अजित पवार यांच्या दबावातून काम करत असल्याचा आरोपाला कट्यारे यांनी जशास-तसे उत्तर दिले. मी पुणे जिल्ह्यातील 21 आमदारांसोबत आणि चार खासदारांसोबत काम करतो, असे प्रत्युत्तर दिवसे यांनी दिले.
63 बारचे लायसन्स रद्द
जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पत्रकार परिषदेतून पुण्यातील कार अपघातावरही भाष्य केलं. भूसंपादनाचे अधिकार जिल्हाधिकार म्हणून माझेच आहेत, असेही दिवसे यांनी म्हटले. तर, कल्याणी नगरमधील अपघातानंतर जिल्ह्यातील 63 बारची लायसन्स रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
कट्यारेंचे आरोप काय?
सध्या पुण्याचे जिल्हाधिकारी असलेले सुहास दिवसे अनेक वर्षे कृषी आयुक्त, क्रिडा आयुक्त, पी एम आर डी ए चे संचालक अशा विविध पदांवर काम करत पुण्यातच ठाण मांडून आहेत. त्यासाठी त्यांनी त्यांच्या राजकीय हितसंबंचा आधार घेतला आहे. सुहास दिवसे यांनी माझ्या कार्यकाळात झालेल्या जमीन अधिग्रहण प्रकरणांची आधीच चौकशी सुरू केलेली असताना 28 मे रोजी त्यांनी खेडच्या तहसील कार्यालयात पुन्हा छापा टाकला. दिवसे यांनी हे सर्व खेड आळंदीच्या आमदारांच्या प्रभावातून केले. तर, निवडणुकीच्या काळातही सतत खेड आळंदीच्या आमदारांना ते भेटत होते. या आमदारांचा सुहास दिवसे यांना त्यांच्या प्रशासकीय सेवेच्या सुरुवातीपासून पाठिंबा राहिला आहे. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुका स्वतंत्र वातावरणात पार पाडण्यासाठी सुहास दिवसे यांची बदली होणे आवश्यक आहे, अशी मागणी कट्यारेंनी तक्रारीतून आयोगाकडे केली होती.