Ajit Pawar Baramati : अजित पवारांशिवाय बारामतीत पान हालत नाही, पण आज गाडी माघारी फिरवावी लागली, अजित पवारांची कोंडी करण्यामागे शरद पवार गटाची खेळी?
मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी विरोध केल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामतीतील कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही.अजित पवारांची अशी कोंडी करण्यामागे शरद पवार गटाची खेळी असल्याची चर्चा बारामती परिसरात आहे.
पुणे : मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी विरोध केल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar)बारामतीतील कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही. राज्यात सुरु असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामुळं आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींना अनेक ठिकाणी गावबंदी करण्यात आली आहे. त्यातच रोहित पवारांनी त्यांची युवा संघर्ष यात्रा याच कारणामुळं स्थगित केल्यानं सत्ताधाऱ्यांवरचा दबाव आणखी वाढलाय. त्यातूनच ज्या बारामतीचं अजित पवारांशिवाय पान हलत नाही त्या बारामतीत अजित पवारांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीजवळील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यासाठी निघाले खरे पण बारामतीत वातावरण तंग असल्याचा रिपोर्ट त्यांना पोलिसांकडून देण्यात आला. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत एकही लोकप्रतिनिधींना गावात फिरकू न देण्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. त्यामुळं अजित पवारांनाही कारखान्याच्या कार्यक्रमाला येऊ देण्यास प्राणपणानं विरोध करण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली.
मराठा आंदोलकांचा हा रागरंग पाहून दौंडपर्यंत पोहचलेल्या अजित पवारांना गाडी माघारी फिरवावी लागली आणि ते पुण्यातील त्यांच्या घरी येऊन थांबले. गेली साडेतीन दशकं बारामतीच्या राजकारणाचे सर्वेसर्वा असलेल्या अजित पवारांना पहिल्यांदाच बारामतीत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलं. अजित पवारांची अशी कोंडी करण्यामागे शरद पवार गटाची खेळी असल्याची चर्चा बारामती परिसरात आहे. अजित पवारांच्या हस्ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या उद्धघाटनाच्या कार्यक्रमाची सगळी तयारी झालेली असताना रोहित पवारांनी अचानक त्यांची युवा संघर्ष यात्रा अचानक स्थगित करण्याचा निर्णय घेतला. रोहित पवारांची पदयात्रा स्थगित झाल्यानं अजित पवारांवर दबाव वाढला. विरोधी पक्षात असलेल्या नेत्यांना जर गावबंदी होत असेल तर सत्ताधारी कसे कार्यक्रम घेऊ शकतात?, असा प्रश्न विचारला गेला. अखेरपर्यंत मनधरणी करण्याचे प्रयत्न माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी करूनही मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक विरोधावर ठाम राहिले आणि अजित पवार बारामतीत येऊ शकले नाहीत. खरं तर अजित पवारांच्या या कार्यक्रमाचं आयोजन अनेक दिवसांपूर्वी करण्यात आलं होतं. मात्र अखेर मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांच्या हस्ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलरमध्ये मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.
पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचं हे लोन वेगाने वाढत जाण्याची शक्यता आहे. जर अजित पवार बारामतीत जाऊ शकत नसतील तर राज्यातील इतर नेते आणि मंत्री गावोगावी सार्वजनिक कार्यक्रम घेऊ शकतील का? याबाबत शंका आहे. प्रत्येक कार्यक्रमाआधी स्थानिक पोलिसांचा रिपोर्ट काय सांगतोय?, याकडे पाहून कार्यक्रमाला जायचं की नाही याचा निर्णय मंत्री घेत आहेत. पण हे असं किती दिवस चालणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणावर राज्य सरकार तोडगा काढत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांसाठी गावाचे रस्ते असेच बंद होत जाणार आहेत.
विरोधी पक्षात असलेले रोहित पवार जर सार्वजनिक कार्यक्रम करू शकत नसतील तर सत्त्ताधारी पक्षात असलेले अजित पवार कसे करू शकतात आणि जर अजित पवार बारामतीत येऊ शकत नसतील तर इतर नेते मतदारसंघात आणि गावोगावी कसे फिरू शकतात?, एका प्रश्नातून दुसरा आणि दुसऱ्या प्रश्नातून तिसरा अशा प्रश्नांची ही मालिका आहे . या गुंत्यात महाराष्ट्रातील सर्वच राजकारणी गुरफटले जाण्याची शक्यता आहे. अर्थात गुंता सोडवण्याची जबाबदारी सत्त्ताधाऱ्यांवर असल्यानं येणारे दिवस त्यांच्यासाठी कसोटी पाहणारे असणार आहेत. राज्याचा कारभार ही पाहायचा आणि आंदोलकांना देखील हाताळायचं अशी दुहेरी कसरत त्यांना करावी लागणार आहे.
इतर महत्वाची बातमी-