Vasant More : 'तात्या वाट बघतोय येताय ना?'; अजित पवार यांच्याकडून वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर
पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॅशिंग आणि तडफदार नेते वसंत मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत पक्षात येण्याची ऑफर दिली आहे.
Vasant More : पुण्यातील (Pune) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते वसंत मोरे (Vasant More) यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. पुण्यातील एका लग्नात अजित पवारांनी वसंत मोरेंना ही ऑफर दिली आहे. 'तात्या, कधी येताय, वाट पाहतोय,’ असं म्हणत अजित पवारांनी मिश्किल भाषेत वसंत मोरेंना राष्ट्रावादीत बोलावलं आहे.
मागील काही दिवसांपासून वसंत मोरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर नाराज होते. त्यामुळे तडफदार नेते काही दिवसांपासून दुसऱ्या पक्षात जाणार अशी चर्चा होती. त्यामुळे वसंत मोरे हे मनसेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेत प्रवेश घेणार असल्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे. महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सगळ्या पक्षाकडून सुरु झाली आहे. त्यात मनसेकडूनही पुणे जिल्हातील गावागावात पक्षबांधणीला सुरुवात झाली आहे. त्याची जबाबदारी वसंत मोरे यांना देण्यात आली आहे. त्यामुळे जर वसंत मोरे राष्ट्रवादीत गेले तर पुण्यात मनसे खिळखिळी होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीकडून ऑफर आल्याचं मोरेंनी मान्य
या सगळ्या पक्षांतराच्या चर्चा सुरु असताना वसंत मोरे यांनी राष्ट्रवादीची ऑफर आल्याचं मान्य केलं आहे. मात्र पक्ष सोडणार नाही, असंही वसंत मोरेंनी स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपासून मनसेवर नाराज असलेले वसंत मोरे यांच्याबाबत शहरातील नेत्यांमध्येही फूट पडत असल्याची चर्चा देखील आहे. त्यामुळे निवडणुकीत मनसेचा तडफदार नेता काय भूमिका घेणार आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेनेकडूनही ऑफर
काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत हे पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मनसे नेते वसंत मोरे यांची भेट घेतली होती. मागील काही दिवसांपासून वसंत मोरे हे मनसेवर नाराज असल्याचं चित्र दिसत होतं. मात्र वसंत मोरे आणि संजय राऊतांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. संजय राऊतांनी वसंत मोरेंच्या कामाचं कौतुक केलं होतं. त्यामुळे वसंत मोरे शिवबंधन बांधणार का?, असा प्रश्न उपस्थित झाला होता. वसंत मोरेंना राऊतांनी 'तात्या' म्हणून हाक देखील मारली होती. मात्र त्यानंतरही वसंत मोरे यांनी पक्ष सोडणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. दोन्ही पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांकडून ऑफर आल्या आहेत. मात्र वसंत मोरे त्यांच्या मनसे न सोडण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं दिसत आहे.
VIDEO : Vasant More on Ajit Pawar Offer Pune : वसंत मोरे यांना अजित पवारांची ऑफर,आता तात्यांचा रिप्लाय