Ajit Pawar : अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना घड्याळ दाखवलं अन् नंतर उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर 'विराजमान' झाले.
Ajit Pawar : विरोधीपक्षनेते अजित पवारांचा वक्तशीरपणाचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला.
Ajit Pawar : विरोधीपक्षनेते अजित पवारांच्या (Ajit Pawar) वक्तशीरपणाचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. यावेळी त्यांनी थेट कायम विरोधी बाकावर असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांना घड्याळ दाखवत कार्यक्रमासाठी उशीर होत असल्याचं सुचित केलं. पुण्यात महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेचा (maharashtra olympic sport) शुभारंभ पार पडत आहे. यावेळी हा प्रकार घडला.
नेमकं काय घडलं?
अजित पवार (Ajit Pawar) यांनी देवेंद्र फडणवीस आणि विभागीय आयुक्त सौरव राव यांना घड्याळ दाखवली. महाराष्ट्र ओपन एटीपी चॅम्पियनशीप स्पर्धेचं पारितोषिक सहा वाजता होणार आहे. मात्र महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेचा शुभारंभ सुरूच होता. अजित पवार बाकी उपस्थित नेत्यांना वारंवार घड्याळाकडे बोट दाखवून तेच सूचित करत आहेत, अशी चर्चा सभागृहात रंगली होती. म्हणूनच स्वागत गीत होताच सूत्रसंचालक जितेंद्र जोशी यांनी प्रस्तावना होईल ,असं सूचित केलं होतं. तेंव्हा अजित पवार क्रीडा सचिव सुहास दिवसेंवर खडसावले आणि आधी स्पर्धेची मशाल पेटवून शुभारंभ करायला सांगितलं. मग दिवसे यांनी सूत्रसंचालकांना तसं सूचित केलं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, क्रीडामंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेचे अध्यक्ष अजित पवार खुर्चीवरून उठले आणि या सर्वांनी राज्य ऑलिम्पिक स्पर्धेची मशाल पेटवून उद्घाटन केलं. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुढच्या दौऱ्यासाठी जायचं असल्यानं ते पुढं रवाना झाले. त्यानंतर मात्र अजित पवार हे उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान झाले.
घडलेल्या या प्रकाराची सध्या सभागृहात जोरदार चर्चा सुरु झाली. कार्यक्रमाला राजकारणी येणार म्हटलं तर कार्यक्रम तासभर उशीरा सुरु होणार हे सामान्यांना आता माहित झालं आहे. त्यामुळे सामान्य लोकदेखील त्याच वेळेनुसार कार्यक्रामाला हजेरी लावतात. सामान्यांनाही याची सवय झाली आहे आणि राजकारण्यांनीदेखील अनेकदा हे मान्यही केलं आहे.
पाहा व्हिडीओ
अजित पवारांचा वक्तशीरपणा...
वेळेचे पक्के आणि शिस्तप्रिय नेते अशी विरोधीपक्षनेते अजित पवारांची ओळख आहे. सकाळी 6 वाजताचा कार्यक्रम असो किंवा रात्री 10 वाजताचा कार्यक्रम असो अजित पवार वेळेवर त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असतात. त्यांच्या या वक्तशीरपणाची कायम राज्यात चर्चा होते. त्यांचे अनेक दौरेही सकाळी 6 वाजता सुरु झाल्याचं आपण यापूर्वी पाहिलं आहे. त्यांच्या याच स्वभावाचा प्रत्यय आज देवेंद्र फडणवीसांनाही आला.